पुणे : विवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच कौमार्य चाचणी घेतली. त्यानंतर मुलगी झाल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला माहेरी हाकलून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका २५ वर्षांच्या विवाहितेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कुर्ला (मुंबई) येथील पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ४ जून २०१७ ते जानेवारी २०२१ दरम्यान घडला.
आरोपीने पत्नीला लग्न झाल्यापासून वेळोवेळी चारित्र्यावर संशय घेऊन तिची कौमार्य चाचणी केली; तसेच तिला मुलगी झाली म्हणून घरातील सर्व कामे करायला लावून उपाशी ठेवले.
त्यातूनच वेळोवेळी दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर जानेवारीत पत्नीला माहेरी पाठवून दिले. अद्याप तिला परत नेण्यास आलेले नाहीत.
दरम्यान, ही महिला स्वत: राहायला गेली होती. मात्र, पतीने राहण्याचे घर बदलले आहे; तसेच पती घरच्यांचे फोन घेण्यास टाळाटाळ करत आहे.
शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेऊन मानसिक व शारीरिक छळाची फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक सपकाळे पुढील तपास करीत आहेत.