Latest

सांगली : ‘लतादीदींमुळे माझ्या बिर्याणीला नाव मिळालं, माझं नाव होऊन माझं अख्खं कुटुंब जगलं’

अनुराधा कोरवी

वारणावती : आष्पाक आत्तार : संगीत क्षेत्रात अनेकांना दीदींमुळे नाव आणि व्यवसाय मिळाला असेल मात्र केटरिंग व्यवसायात दीदींमुळे माझं नाव होऊन माझं अख्खं कुटुंब जगलं आणि युसुफचा युसूफभाई झाला. आजही त्यांच्या नावाने मी जगतो आहे अशा भावना शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या युसूफ बागवान यांनी व्यक्त केल्या.

युसूफ भाई बागवान मूळचे सातारचे. मात्र गेल्या दोन वर्षापासून ते शेडगेवाडी येथील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत आहेत. युसूफ भाई आणि दीदी यांच्यात निर्माण झालेल्या नात्याबाबत बोलताना आणि त्यांच्या विषयीच्या आठवणी जागवताना युसूफ भाई म्हणाले, साताऱ्यात आमचा वडिलोपार्जित बेकरी व्यवसाय होता. त्यावेळी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. त्यांची गाणी ऐकत- ऐकत त्यांच्याशी बोलण्याची इच्छा झाली.

यानंतर साताऱ्यातील सिटी पोस्टजवळ जावून मी दीदींच्या घरी ट्रंक कॉल करायचो, त्या भेटत नव्हत्या. सलग पाच वर्ष मी कॉल करत राहिलो. आणि एके दिवशी दीदींनी माझा कॉल उचलला. तेव्हापासून सुरू झालेला आमचा संवाद आजपर्यंत होता. दीदींच्या जाण्यामुळे आता तो खंडित झाला याचं मला खूपच दुःख होतं आहे.

दीदींशी निर्माण झालेल्या नात्याविषयी बोलताना युसूफभाई म्हणाले की, एके दिवशी दिदींशी बोलण्याची इच्छा झाली त्यामुळे त्यांच्या घरी कॉल केला तर त्या भेटल्या नाहीत. मी माझ्या शेजारचा एक नंबर दिला. काही दिवसानंतर त्या नंबरवर दीदींचा फोन आला. आमच्या फोनवर गप्पा झाल्या. दीदींनी विचारले सध्या काय करतोस?. मी म्हणालो केटरिंगचा व्यवसाय सुरू केलाय, मांसाहारी पदार्थ व बिर्याणी बनवतो. दीदींनी यावर पुन्हा मी येते एकदा तुझ्या घरी असे म्हटले. यानंतर १९७८ मध्ये पुन्हा दीदीचा फोन आला. त्यांनी मला पुण्याला भेटायला येणार आहेस का? असे विचारले.

मी पुण्याला गेलो मात्र, मनात हुरहूर होती की दीदींची भेट होईल की नाही. पण सुदैवाने आम्हची भेट झाली. गेल्या दहा वर्षापासून फोनवर संवाद साधणाऱ्या दीदींना प्रत्यक्षात भेटून झालेला आनंद अविस्मरणीय होता. त्यावेळी दीदींनी माझ्या कुटुंबाची माझी विचारपूस करून मी तुझ्या घरी येणार आहे म्हणून सांगितले. त्यानंतर तब्बल २४ वर्षानंतर २००२ साली नोव्हेंबर महिन्यात कोल्हापुरहून पुण्याकडे परताना त्यांनी फोन करून युसूफभाई घरी येते जेवायला असे सांगितले. यानंतर माझी धावपळ उडाली.

तरीही मुलगा अबिदआली, पत्नी जुलेखा, मुलगी मासुमा यांनासोबत घेऊन मी दिदींच्या जेवणाचा बेत आखला. जुन्या हायवे येथील रस्ता खराब असतानाही दिदी माझ्या रानातल्या घरी आल्या. त्याच्यासोबत उषाताई, मीना खडीकर आणि इतर दोन- चार मंडळी होते. मी बनवलेल्या बिर्याणीवर ताव मारल्यानंतर भाई तुझ्या हाताला देवाने चव दिली आहे असे त्यांनी उद्गार काढून माझे कौतुक केले. यावेळी माझी मुलगी मासुमाने दीदींच्या हातावर मेहंदी काढली. घरगुती गप्पा झाल्या आणि दीदींनी निघताना पत्नीला बोलावून तुझ्यासाठी साडी आणली आहे असे सांगत साडी मलाही घड्याळ भेट दिले.

यानंतर आमची आणखी जवळीकता वाढत गेली. दीदी पुण्याला आल्या की मला बोलून घ्यायच्या आणि मांसाहारीचा बेत करायच्या. माझ्या हाताचा चव चाकायला त्या नेहमी मला बोलवत होत्या. याशिवाय दीदी नेहमी वरचेवर येत जा असे म्हणायच्या. चार-पाच महिन्यानंतर दीदी पुन्हा बोलवायच्या पुन्हा तेच काम गप्पा आणि जेवण व्हायचे. जाताना दीदी मला म्हणायच्या ही घे भेट. मी नाकारायचो पण दीदी म्हणायच्या माझी बंद पाकिटातील भेट नाकारू नकोस.

दीदींच्या आठवणी जागवताना युसूफ भाईच्या डोळ्यातून दुःखाश्रू वाहत होते. जिच्यामुळे माझ्या बिर्याणीला नाव मिळाले. माझं अख्खं कुटुंब जंगलं आणि युसुफचा युसूफ भाई झाला ती माझी अन्नदात्री गेली. मात्र, जाताना तिने माझ्या अख्ख्या कुटुंबाला जगण्याचं बळ देऊन गेली. अशा शब्दात लतादीदीं बद्दल भावना व्यक्त करत यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

देशात लतादीदींचे कोट्यावधी चाहते असतानाही एका सर्वसामान्य कुटुंबातील आचारी काम करणाऱ्या युसूफ चाचा यांच्याशी नातं अतूट ठेवणाऱ्या लतादीदीनी नाती कशी जपावीत याच समाजासमोर ठेवलेलं हे उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

लता दीदींनी युसूफभाईच्या हातची चव चाखली

दीदींच्या सांगण्यामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते, शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते यांनी युसूफभाई यांच्या हातची चव चाखली आहे. हे अधोरेखित करताना या गोष्टीचा त्यांना असलेला अभिमान जाणवत होता .

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT