पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान. ( संग्रहित छायाचित्र ) 
Latest

इम्रान खानला झटका, अटक वॉरंट रद्द करण्‍यास न्‍यायालयाचा नकार, जाणून घ्‍या काय आहे प्रकरण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्‍लामाबाद जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयाचे आज चांगलाच झटका दिला. त्‍यांच्‍या विरुद्‍ध जारी करण्‍यात आलेले अजामिनपात्र अटक वॉरंट रद्द करण्‍यासाठी दाखल करण्‍यात आलेली याचिका न्‍यायालयाने फेटाळली.

इम्रान खान यांनी नेहमीच न्‍यायालयाच्‍या आदेशाचे पालन केले आहे. ते हजर होण्‍यास तयार असतील तर त्‍यांना पोलीस अटक करु शकत नाहीत, असा युक्‍तीवाद इम्रान खान यांच्‍या वकिलांनी केला. यावर सत्र न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, अटक वॉरंट रद्‍द करण्‍यासाठी इम्रान खान इस्‍लामाबाद उच्‍च न्‍यायालयात दाद मागू शकतात.

28 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी तोशाखाना प्रकरणी इम्रान खान गैरहजर राहिल्याबद्दल अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. रविवारी पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबाद पोलिसांचे पथक न्यायालयाच्या आदेशानुसार अटक वॉरंटवर प्रक्रिया करण्यासाठी जमान पार्कमध्ये पोहोचले. मात्र, इम्रानला अटक होऊ शकली नाही. आता या प्रकरणी इम्रान खान यांनी लाहोर उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.

रविवारी इस्‍लामाबाद पोलिस इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी अटक करण्‍यासाठी लाहोर येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी गेले होते. २०१८ मध्‍ये पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. त्‍यांना अधिकृत भेटींमध्ये अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या, त्या तोशाखान्यात जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी संबंधित कायद्यानुसार सवलतीच्या दरात ते विकत घेतले आणि मोठ्या नफ्यात विकण्‍यात आल्‍याचा आरोप इम्रान खान यांच्‍यावर आहे. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता.

इस्लामाबाद पोलिस लाहोर निवासस्थानी पोहोचल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. इम्रान खान यांच्‍या निवासस्‍थानी त्‍यांच्‍या समर्थकांनी धाव घेतली. काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला. यावेळी समर्थकांना संबोधित करताना इम्रान खान यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तसेच आपल्‍या हत्‍येचा कट रचला गेला आहे, असा आरोपही त्‍यांनी केला होता.

इम्रान खान यांच्या भाषणांवर बंदी

सर्व परवानाधारकांना 'राज्य संस्थांच्या विरोधात कोणतीही सामग्री प्रसारित करण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागील निर्देशांचा संदर्भ देत पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (PEMRA) म्‍हटलं आहे की, इम्रान खान त्यांच्या भाषणात सरकारवर निराधार आरोप करत होते. त्यांच्या प्रक्षोभक विधानांद्वारे द्वेषयुक्त भाषण पसरवत होते. त्‍यांची विधाने कायदा आणि सुव्यवस्था बाधित करु शकतात तसेच सार्वजनिक शांतता आणि शांतता बिघडवण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे यापुढे इम्रान खान यांची भाषण टीव्‍ही प्रसारित करण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे.

इम्रान खान यांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकचे मुख्य न्यायाधीश उमर अताल बंदियाल यांना पत्र लिहित, माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. माझ्या संभाव्य हत्येचा प्रयत्न लक्षात घेता न्यायालयात हजर राहण्यासाठी मला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी इम्रान खान यांनी केली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT