Latest

विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार : दीपक केसरकर

अमृता चौगुले

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : शिक्षणक्षेत्र हे विद्यार्थ्यांसाठी फॅक्टरी न बनता शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्‍हणाले.

'टाइम टू ग्रो' मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित शैक्षणिक परिषदेत मंत्री केसरकर बोलत होते. शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, महिला व बाल विकास आयुक्त आर.विमला, टाइम टू ग्रो मीडियाचे संस्थापक मनमीत खुराना आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना केसरकर की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन शैक्षणिक धोरण भविष्यकाळातील एक सुवर्ण संधी आहे. मातृभाषेतून दिले गेलेले शिक्षण अधिक परिणामकारक ठरते यादृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणात विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात एक लाखांपेक्षा अधिक शाळा असून ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्येही शिक्षणाची सोय सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांवर अधिक भर दिला जात आहे. कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणासाठी एचसीएल, टीआयएसएस या संस्थांसोबत करार करण्यात आला आहे. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नव्हती, तथापि त्यांनी किती ज्ञान आत्मसात केले याचे विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना मातृभाषेचे महत्त्व पटवून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी केसरकर यांनी यावेळी जाणून घेतल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घडविण्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा त्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT