Latest

आयटीनगरीत फोफावतेय खासगी सावकारी; आत्महत्या किंवा घरदार सोडून जाणे हाच पर्याय

अमृता चौगुले

सागर शितोळे

हिंजवडी : राज्यात खासगी सावकारी धंद्याचा कायमचा बिमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल केला आहे. यासाठी जनजागृती करत सन 2014 मध्ये नवीन कायदा मंजूर केला. मात्र, आयटी परिसरात काहीजण आपले प्रस्त व गुंडगिरीच्या जोरावर आजही खासगी सावकारीचा धंदा राजरोसपणे करत आहेत. यामुळे या सावकारीतून सर्वसामान्य नागरिक पैसे घेत त्यात आणखी फसत आहेत. त्यामुळे आता या सावकारीविरुद्ध प्रशासनाला नव्या पद्धतीने काम करावे लागणार आहे.

खासगी सावकारी व्यवसाय करण्यासाठी विविध कल्पतृत्या अवलंबल्या जात आहेत. त्यात जमिनीचे विविध प्रकारचे रजिस्ट्रेशन करुन व्याजाने पैसे देणे, एकरकमी पैसे देत दररोज पैसे वसूल करणे, दरमहिना व्याज परतावा मिळवण्यासाठी व्याजाने पैसे देणे असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. परंतु, पोलिसांपर्यंत तक्रार करण्यासाठी जाण्यास कुणीही तयार होत नसल्याने या अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया अनेक पांढरपेशी लोक गोळा करीत आहेत.

परिसरात युवकांनी मागील काही वर्षांत जमीन विक्री आणि अन्य मार्गांनी मोठी माया मिळवली. यातून अनेकांनी अशा प्रकारे हा व्यवसाय सुरू केला. प्रामुख्याने गुंठेवारी व्यवहार करणारे, उद्योजक, दुकानदार यांच्यासह सर्वसामान्य तापरीचालकदेखील यात गुरफटला गेला असल्याचे निदर्शनास येत आहे. हे तथाकथित खासगी सावकार महिना 5 ते 40 टक्के व्याजाने पैसे देतात. तसेच, त्याची वसुली करण्यासाठी सर्व नैतिक-अनैतिक मार्गांचा वापर केला जातो. वसुलीसाठी आलेले युवक घरातील चीजवस्तू उचलूनदेखील नेतात. यातून धमकी देण्याचे प्रकार घडतात.

मुळशीसह हिंजवडी आयटीनगरी परिसरात अनेकांनी खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे घेतले आहेत. अवैध सावकारीचा धंदा करणार्‍या काहींनी व्याजापोटी अगोदरच कोर्‍या चेकवर सह्या किंवा जमीन, घरे, वाहने लिहून घेत आहेत. त्यातील काहीजण ते वेळेत परत करू शकले नाहीत. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे हा व्यवसाय काही प्रमाणात मंद होता. मात्र, आता पुन्हा या व्यवसायात काम करणारे सक्रिय झाले असून संभाव्य ग्राहक शोधत आहेत.

आत्महत्या किंवा घरदार सोडून जाणे हाच पर्याय

अनेकांनी या सावकारी कंटाळून घर सोडले आहे किंवा आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल टाकले आहे. मागील काही वर्षांमध्ये या भागात अवैध सावकारीचे पैसे परत करता येऊ शकत नसल्याने अनेकजण कायमचे फरार झाले आहेत. अनेकांनी व्यवसायासाठी व्याजाने लाखो रुपये घेतले असल्याच्या घटना घडल्या आहेत. यामधील बहुतेक जणांनी मुद्दल व व्याज देऊनही खासगी अवैध सावकारांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी घर खाली करायला लावणे, जमिनीची खरेदीखते, दुचाकी, चारचाकी वाहने ताब्यात लिहून घेणे अशा घटना घडत आहेत. यामुळे तर काही वर्षांपासून कर्जदार हा सावकारांना कंटाळा, विविध प्रकारच्या युक्ती लढवून जीवनयात्रा संपवून टाकली आहे. परिणामी घेतलेल्या रक्कमेच्या व्याजाचे आकडे फुगत गेले. रक्कम थकल्यास संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जातात. तसेच, मारहाणही केली जाते.

कोरा चेक, एक स्टँप पेपर हाच सावकाराचा मुख्य मार्ग

आयटी परिसरातील एका गावात एका युवकाने लाखो रुपये मित्र परिवार आणि नातेवाईक यांच्याकडून उसने आणि व्याजाने घेत अनेक लहान-मोठे व्यवसाय सुरू केले. परंतु, लॉकडाऊन आणि त्यानंतर हे पैसे परत करू न शकल्यामुळे आता तो युवक परिवारासह निघून गेल्याने अनेकजण त्याच्या शोधत आहेत.

एका सावकाराकडून उसने पैसे घेतले. त्याबदल्यात मी त्यांच्याकडे एक कोरा चेक व एक स्टँप पेपरवर सही करून ठेवला होता. मी व्याजाने एक लाख रुपये घेतले होते, त्याचे व्याज साडे तीन लाख रुपये झाले आहे. त्यातून मित्र परिवारामध्ये बदनामी होत आहे. तसेच, मला गावामध्ये जाता येत नाही.
– एक उद्योजक, हिंजवडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT