इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या पवारांविरोधात लढायचे असेल तर सर्वांची एकजूट झाली पाहिजे. लांडग्यांच्या कळपापर्यंत व बारामतीपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी इंदापुरात सोमवारी (दि. 16) धनगर जागर यात्रेत केली. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पडळकर यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन तसेच घोड्यावर बसवून नगरपरिषदेच्या मैदानापर्यंत पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढण्यात आली.
सभेत आमदार पडळकर म्हणाले की, आम्ही धनगर जागर यात्रा सुरू केल्याने लांडग्यांची पिले अपप्रचार करू लागली आहेत.
जिल्ह्यातील धनगर व रामोशी समाजाच्या जमिनी येथील प्रस्थापितांनी कागदपत्रे फेरफार करून लाटल्या. तेच पुण्याच्या आजूबाजूला गुंठामंत्री झाले आहेत. 1970 ते 90 च्या दशकात बारामती तालुक्यातील बी. के. कोकरे नावाच्या तरुणाने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या माध्यमातून जागृती करण्याचे काम हाती घेतले, हे शरद पवार यांना कळल्यानंतर त्यांनी फोडाफोडीचे राजकारण करत रिपब्लिकन पक्ष ज्या पद्धतीने फोडला त्याच पद्धतीने कोकरे यांना फोडले. सन 1990 ला शरद पवारांनी एन. टी.मधून आरक्षण दिले, त्यातच धनगर समाजाचा घात झाला.
संबंधित बातम्या :
आम्हाला एसटीमधून आरक्षण पाहिजे. बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले. पवारांचे सरकार असते तर हे नाव दिले असते का? असा सवालही पडळकरांनी या वेळी उपस्थित केला. धनगर समाजाची केस न्यायालयात सुरू आहे, राज्य सरकारने धनगर समाजाच्या वतीने बाजू मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्याबद्दल आभार मानतो. डिसेंबर महिन्यात अंतिम सुनावणी न्यायालयाने तीन दिवस ठेवली आहे, त्या वेळी धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळेल, असेही पडळकर यांनी सांगितले. आरक्षण हे आपलेच आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही आपली मागणी असून, ती न्यायालयातून न्यायरूपी मिळेलच, नाहीतर आपण रस्त्यावर येऊ, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी माऊली वाघमोडे, विलास वाघमोडे, गजानन वाकसे, दीपक काटे, पोपट पवार, महेंद्र रेडके, सचिन आरडे, आबासाहेब थोरात, बाळासाहेब डोंबाळे, आकाश कांबळे, अशोक चोरमले, अण्णासाहेब चोरमले, विष्णुपंत मकर, अनिता खरात यांच्यासह धनगर समाजबांधव उपस्थित होते.
'एसटीडी'तून बाहेर या
'एस' म्हणजे साहेब, 'टी' म्हणजे ताई आणि 'डी' म्हणजे दादा यांच्या गुलामगिरीतून बाहेर या, असे म्हणत आपले साहेब एकच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, असे पडळकर यांनी स्पष्ट केले.