Latest

Kapil vs Virat : कपिल देव यांचे पुन्हा विराट कोहलीबाबत मोठे विधान, म्हणाले…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. तो सतत धावांसाठी झगडत असल्याचे आपल्याला दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही कोहली अपयशी ठरला. या सामन्यात त्याला आपला फॉर्म परत मिळवण्याची मोठी संधी होती. भारताकडे मोठे लक्ष्यही गाठायचे नव्हते आणि संघाने सुरुवातीच्या विकेट्सही गमावल्या. अशा स्थितीत कोहलीला क्रिजवर स्थिरावून धावा काढायच्या होत्या, पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. इंग्लंड दौऱ्यानंतर भारताला वेस्ट इंडिजच्या दौ-यावर जायचे आहे. या दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतून कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे की त्याला खराब फॉर्ममुळे संघातून वगळले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आता या विषयावरून पुन्हा एकदा तोफ डागली आहे.

कपिल देव यांनी काही दिवसांपूर्वी कोहलीबाबत वक्तव्य केले होते की, जर रविचंद्रन अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, तर कोहलीलाही टी-२० संघातून का वगळले जाऊ शकत नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानावरून मोठे वादळ निर्माण होते. कपिल देव यांच्या या वक्तव्यावर कर्णधार रोहित शर्मासह अनेक माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनी आपलं मत मांडलं. बीसीसीआयने विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाशिवाय वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी १८ जणांचा टी २० संघ जाहीर केला आहे. कोहली-बुमराहच्या अनुपस्थितीबाबत बीसीसीआयने कोणतेही भाष्य केलेले नाही, परंतु माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही ज्येष्ठ क्रिकेटपटूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, आता कपिल देव यांनी यावर आपले वेगळे मत मांडले आहे.

एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाले, 'विराट कोहलीसारख्या खेळाडूला वगळावे असे मी म्हणू शकत नाही. तो मोठा खेळाडू आहे. त्याला आदर देण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे असे तुम्ही म्हटले असेल तर त्यात काही गैर नाही,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कंबरेच्या दुखापतीमुळे कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा भाग नव्हता. तथापि, लॉर्ड्सवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला. या सामन्यात त्याने १६ धावांचे योगदान दिले आणि पुन्हा एकदा एक मोठी खेळी खेळण्यापासून तो पुन्हा वंचित राहिला.

कपिल देव म्हणाले, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा खेळाडूला फॉर्ममध्ये कसे आणायचे? विराट हा काही सामान्य क्रिकेटपटू नाही. त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी त्याने अधिक सराव करावा आणि अधिक सामने खेळावेत. मला वाटत नाही की या जगात असा कोणताही खेळाडू आहे जो टी-२० मध्ये कोहलीपेक्षा मोठा आहे, परंतु जेव्हा तुमची कामगिरी चांगली नसते तेव्हा निवडकर्ते त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात. मला असं वाटतं की जर कोणता खेळाडू सातत्याने खराब प्रदर्शन करत असेल तर त्याला विश्रांती दिली जाऊ शकते किंवा डच्चू दिले जाऊ शकते.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT