हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : हैदराबादमध्ये (Hyderabad Honor Killing) बुधवारी संध्याकाळी पत्नीसह मोटरसायकलवरून घरी जाणाऱ्या तरुणाची दोघांनी लोखंडी रॉडने वार करून निघृण हत्या केली. हत्या झालेल्या युवकाचे नाव बी. नागराजू असे आहे. त्याची पत्नी सय्यद अश्रीन फातिमा हिच्या नातेवाईकांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. फातिमाच्या दोन भावांना आरोपी करण्यात आले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. त्यामध्ये नागराजूचे (Hyderabad Honor Killing) अत्यंत निर्दयीपणे डोके ठेचून त्याची हत्या झालेचे स्पष्ट दिसत आहे. हल्लेखोरांसमोर नागराजूची पत्नी फातिमा असहाय्य दिसत आहे. या हत्येनंतर नागरिकांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला पण ते पसार होण्यात यशस्वी झाले.
नागराजू आणि फातिमा (Hyderabad Honor Killing) यांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. ते दोघे दहावीपासून एकमेकांना ओळखत होते. जानेवारीमध्ये हैदराबादमधील आर्य समाज मंदिरात त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर फातिमाने तिचे नाव बदलून पल्लवी ठेवले होते. फातिमाच्या कुटुंबीयांनी नागराजूला धमकी देऊन तिच्या पासून दूर राहण्यास सांगितले होते.
बुधवारी संध्याकाळी नागराजू आणि फातिमा (Hyderabad Honor Killing) घरातून निघाले असताना सरूरनगरमध्ये दोघांनी त्यांच्या दुचाकी थांबवल्या. हल्लेखोरांनी नागराजूच्या डोक्यावर वारंवार लोखंडी रॉडने वार करत डोके ठेचून त्याची हत्या केली. हल्लेखोर पळून गेले पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या मोबाईल फोनमधील व्हिडिओमध्ये व सीसीटिव्ही कॅमे-यामध्ये हल्लेखोर कैद झाले आहे.
या घटनेनंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध केल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
दोन जणांनी एकाची हत्या केली. मृत युवक पत्नीसह दुचाकीवरून जात होते. त्यांचे नुकतेच लग्न झाले असून दोघेही वेगवेगळ्या समाजाचे आहेत. मृत युवकाच्या पत्नीच्या भावांनी नागराजूवर रॉडने वार करून त्यांची हत्या केली.
– श्रीधर रेड्डी, पोलीस अधिकारी