File Photo 
Latest

JEE Mains : जेईई मेन्सची अशी करा तयारी

अमृता चौगुले

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) पुढील वर्षी होणार्‍या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन्स), राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसह (नीट) होणार्‍या विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यातील जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा 24 जानेवारी ते 1 फेब—ुवारी या कालावधीत, तर दुसरा टप्पा 1 ते 15 एप्रिलदरम्यान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची जोरदार तयारी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जेईई मेन्सच्या माध्यमातून देशातील विविध आयआयटी, एनआयटीमध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थी जेईई मेन्स आणि जेईई अ‍ॅडव्हॉन्स अशा दोन परीक्षांची आतुरतेने वाट पाहतात. परंतु या परीक्षांची काठीण्यपातळीदेखील अधिक आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच या परीक्षांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले, तर या परीक्षांना सामोरे जाणे शक्य असल्याचे प्रवेश परीक्षा तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

शालेय जीवनापासूनच तयारी आवश्यक…

जेईईच्या तयारीसाठी विद्यार्थी बारावीनंतर खासगी क्लासेसचा अवलंब करतात, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडे वेळ कमी असतो आणि चांगली तयारी करणे शक्य नसते. त्यामुळे आठवी किंवा नववीनंतर तयारीला सुरुवात करावी, असे विद्यार्थ्यांना सुचवण्यात येते. जितक्या लवकर तयारी सुरू होईल, तितका वेळ विद्यार्थ्यांना मिळेल. त्यामुळे शालेय जीवनापासूनच जेईई,नीट अशा प्रवेश परीक्षांचा अभ्यास केल्यास यश मिळणे सहज शक्य होते.

महत्त्वाच्या विषयांवर ठेवा लक्ष…

जेईई मेन्सची तयारी करताना विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्या विषयांवर जास्त प्रश्न विचारले जातात किंवा जे विषय जास्त महत्त्वाचे आहेत त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. काही मोजक्याच विषयांची तयारी करणे अडचणीचे ठरू शकते. तयारी पूर्ण असली पाहिजे पण परीक्षेत ज्या विषयांना जास्त महत्त्व आहे त्यावर जास्त लक्ष असायला हवे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम तपासून पाहणे आवश्यक आहे.

अधिकाधिक सराव हाच यशाचा मंत्र…

सराव हा प्रत्येक परीक्षेसाठी आधार आहे. प्रश्नांचा जितका जास्त सराव कराल तितक्या संकल्पना मनात स्पष्ट होतील. तोच प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि चूक झाल्यास पुन्हा सराव केला तर चुका कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अधिकाधिक सराव हाच यशाचा मंत्र आहे.

अभ्यासाचे साहित्य मर्यादित ठेवा…

जेईई परीक्षेशी संबंधित अनेक पुस्तके आणि साहित्य बाजारात उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी एकाच विषयासाठी अनेक पुस्तके वापरतात, ज्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. जेव्हा बरेच पर्याय उपलब्ध असतील तेव्हा एकाच विषयावर अनेक मते समोर येतील आणि गोंधळ वाढेल. त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके किंवा साहित्य वाचण्याच्या प्रक्रियेत पुनरावृत्तीची प्रक्रिया हुकते. विद्यार्थ्यांनी अनेक साधनांऐवजी काही मोजक्याच पुस्तकांची अनेकवेळा उजळणी करणे गरजेचे आहे.

स्वत:चा अभ्यास अधिक महत्त्वाचा

जेईई किंवा नीट कोणत्याही परीक्षेसाठी स्वत:चा अभ्यास आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी तयारीसाठी खासगी क्लासेसची मदतही घेतात. पण केवळ तयारी करून यश मिळणार नाही. यशासाठी 'सेल्फ स्टडी' आवश्यक आहे. खासगी क्लासेस फक्त तयारीसाठी मार्गदर्शन करू शकतात. शेवटी अभ्यास विद्यार्थ्यांनाच करायचा असतो. त्यामुळे स्वत: अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे आहे हेदेखील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT