पुढारी ऑनलाईन डेस्क
हॉलिवूड चित्रपटांचे प्रसिध्द आणि दिग्गज अभिनेता ब्रूस विलिस याने अभिनयाला अलविदा केला आहे. तो ॲफेसिया नावाच्या आजाराने त्रस्त आहे. ब्रूस विलिसने हॉलिवूडच्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
या आजारात समजून घेण्याची क्षमता आणि व्यक्त करण्याची क्षमता कमी होते, असे ब्रुसच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. ब्रुसच्या इन्स्टाग्राम पेजवर अभिनेत्याच्या कुटुंबियांनी जाहिर केलं आहे की, ब्रुसला नुकताच aphasia नावाच्या आजाराचे निदान झाले आहे. त्यामुळे त्याच्या ज्ञान करून घेण्याच्या क्षमतेवरदेखील परिणाम होत असल्याचं म्हटलं गेलंय. त्यामुळे खूप विचार करून ब्रुसने हा निर्णय घेतलाय.
या आणि खूप विचारविनिमयाचा परिणाम म्हणून, ब्रूसने आपली अभिनय कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, आमच्या कुटुंबासाठी हा आव्हानात्मक काळ आहे. आम्ही तुमच्या निरंतर प्रेम आणि समर्थनाची प्रशंसा करतो. आम्ही एक मजबूत कुटुंब म्हणून जगत आहोत. ब्रुस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहीत आहे, जसे तुम्ही सर्वजण त्याच्यासाठी आहात.
रिपोर्टनुसार, अभिनेता ब्रूस विलिस हा ॲफेसिया नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. हा एक मेंदूचा विकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला बोललेले आणि लिहिलेले शब्द बोलणे, लिहिणे आणि समजण्यास त्रास होतो. ही अशी स्थिती आहे जी एखाद्या व्यक्तीची संवादाची शक्ती काढून घेऊ शकते.
अभिनेत्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, विलिसने १९८० च्या दशकात त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अभिनेत्याने द वर्डिक्ट, मूनलाइटिंग, द बॉक्सिंग, होस्टेज, आऊट ऑफ डेथ, ग्लास यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच अभिनेता त्याच्या डाय हार्ड या मालिकेसाठी ओळखला जातो.