गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यासाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा पाचवा दिवस उलटूनही शासनाने दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ आज (दि.२३) गोरेगाव येथे केंद्र सरकारच्या विरोधात दूध ओतून निषेध व्यक्त करण्यात आला.
गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बेमुदत उपोषणाचा पाचवा दिवस सुरू आहे. उपोषणाची धग कायम आहे. उपोषणात बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अन्नत्याग केला आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिने यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर गजानन कावरखे व ऋषिकेश बर्वे यांची तब्येत गंभीर होत चालली आहे.
गेल्या १८ जानेवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या पीकविमा लाभासाठी उपोषणाला तालुक्यासह ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी उपोषणाला हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या उपोषणाची दखल सरकार घेत नसल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी दूध ओतून निषेध नोंदवला.
हेही वाचलंत का ?