नवी दिल्ली : वृत्तसंस्था : Helicopter Accident : देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्यांमध्ये महत्त्वाचे लष्करी अधिकारी होते. या शहिदांपैकी कुणी जम्मू-काश्मिरात विशेष सेवा बजावली आहे, तर कुणी नक्षलविरोधी मोहिमांमध्ये महत्त्वाचा सहभाग नोंदवला आहे. महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीतही काहींनी देशाची सेवा बजावली आहे. त्यांची ही ओळख…
ब्रिगेडियर एल.एस.लिड्डर हे चश्रफ ऑफ डिफेन्स स्टाफमध्ये सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. सध्या ते जनरल रावत यांचे संरक्षण सहायक होते. नॅशनल डिफेन्स अकादमीतून प्रशिक्षण घेतलेल्या लिड्डर यांनी पूर्व काश्मीरमधील लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मिलिटरी ऑपरेशन डायरेक्टोरेटमध्येही ते कार्यरत होते. त्यांच्या सेवेबद्दल सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.
स्क्वॉड्रन लिडर कुलदीप सिंह हे अपघातग्रस्त हेलिकाप्टरचे सहवैमानिक होते. मूळचे जयपूरचे असलेल्या कुलदीप सिंह यांची पार्श्वभूमी सैनिकी परंपरेची आहे. त्यांचे वडील नौदलातून सेवानिवृत्त झाले आहेत, तर बहीण सध्या नौदलात आहे.
लान्सनायक बी. साई. तेजा यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमध्ये काम केले आहे. ते मूळचे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्हातील रहिवाशी आहेत.
नायक गुरसेवक सिंग 9 पॅरा स्पेशल फोर्समध्ये कर्तव्यावर होते. त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमध्ये प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर म्हणून काम केले आहे. ते दोन आठवड्यांपूर्वीच रजेवरून पुन्हा ड्युटीवर रुजू झाले होते. ते काही आठवड्यांत सेवानिवृत्त होणार होते.
पी.एस. चौहान हे हवाई दलात विंग कमांडर म्हणून कार्यरत होते. ते अपघातग्रस्त एमआय-17 या हेलिकॉप्टरचे मुख्य पायलट होते. देशातील एक उत्कृष्ट पायलट अशी त्यांची ओळख होती. त्यांना एमआय-17 हे हेलिकॉप्टर चालवण्याचा मोठा अनुभव होता. सध्या ते कोईम्बतूर येथील भारतीय वायूसेनेच्या स्टेशनवर तैनात होते. त्यांचा जन्म आग्रा येथे झाला. ते 2000 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाले. 22 जून 2002 रोजी ते कमिशन्ड ऑफिसर झाले आणि 2015 मध्ये त्यांना विंग कमांडर म्हणून पदोन्नती मिळाली होती.
गेल्या 12 वर्षांपासून राणा प्रताप दास भारतीय हवाई दलात वॉरंट ऑफिसर म्हणून कार्यरत होते. सध्या ते लष्कराच्या टेक्निकल विभागात कार्यरत होते. ते मूळचे ओडिशातील कृष्णचंद्रपूर गावचे असून त्यांच्या पत्नी शिवांगी डेंटिस्ट आहेत.
लान्सनायक विवेक कुमार हे मूळचे हिमाचल प्रदेशातील असून त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमध्ये काम केले आहे. सध्या ते पॅरा कमांडर म्हणून कर्तव्य बजावत होते.
लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमध्ये कार्यरत होते. जनरल रावत यांच्यासारखीच त्यांची कारकीर्द 11 गोरखा रायफल्समधून सुरू झाली. सियाचीन ग्लेशियरवरील बंदोबस्तात तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही ते सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या बटालियनबरोबरच इतर विविध ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतला होता. ते मूळचे लखनौचे, पण नंतर ते नवी दिल्लीत स्थायिक झाले.
केरळचे असणारे प्रदीप अरक्कल वॉरंट ऑफिसर म्हणून कार्यरत होतेे. 2004 मध्ये ते हवाई दलात भरती झाले होते.
छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानात त्यांचा सहभाग होता. सध्या ते कोईम्बतूर येथील सुलूर एअरबेसवर सेवा बजावत होते. 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या महापुरादरम्यानच्या बचाव कार्यावेळी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतींचे विशेष सन्मानपदक मिळाले होते.
मूळचे मध्य प्रदेशचे असणारे नायक जितेंद्र कुमार यांनी 3-पॅरा या विशेष फोर्समध्ये काम केले आहे.
त्यांनी जनरल रावत यांच्याबरोबरही काम केले आहे. रावत यांच्या सुरक्षारक्षकांपैकी ते एक होते.
हवालदार सत्पाल राय हे मूळ दार्जिलिंगचे असून जनरल बिपिन रावत यांचे ते सुरक्षा अधिकारी होते.