पुणे; वृत्तसंस्था : भारताचा आघाडीचा अष्टपैलू हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्ध होणार्या पुढील आयसीसी विश्वचषक साखळी सामन्यात खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केले. बांगला देशविरुद्ध येथे झालेल्या लढतीत पंड्याला घोट्याची दुखापत झाली होती. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पुढील साखळी लढत रविवारी धर्मशाळा येथे होत आहे. हार्दिक पंड्या आता संघासमवेत धर्मशाळा येथे जाणार नाही. सध्या त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आता लखनौमधील इंग्लंडविरुद्ध लढतीतच तो खेळू शकेल, असे सूत्रानी यावेळी स्पष्ट केले. भारत-इंग्लंड यांच्यातील लढत 29 ऑक्टोबरला खेळवली जाणार आहे.
बांगला देशच्या डावातील नवव्या षटकात व स्वत:च्या पहिल्या षटकातच पंड्याचा घोटा दुखावला होता. आपल्याच गोलंदाजीवर फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली. त्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली व त्यापुढे तो खेळूही शकला नव्हता. पंड्यावर आता बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार केले जाणार आहेत.
अष्टपैलू खेळाडू या नात्याने पंड्याने भारतीय संघासाठी लक्षवेधी योगदान दिले आहे. तो स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळू शकतोच. शिवाय, सहाव्या गोलंदाजाची जागाही तो सक्षमपणे भरून काढू शकतो आणि हे सर्वात महत्त्वाचे आहे. पंड्याने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांत 16 षटके गोलंदाजी केली असून यात 5 बळी घेतले आहेत.
आता हार्दिक पंड्यास तोडीस तोड अष्टपैलू खेळाडू संघात उपलब्ध नसल्याने भारताला न्यूझीलंडविरुद्ध पंड्याऐवजी सूर्यकुमार यादव आणि शार्दूल ठाकूरऐवजी मोहम्मद शमी यांना खेळवावे लागेल, असे संकेत आहेत. मात्र, या परिस्थितीतही रोहितसेनेकडे त्या लढतीत पाचच स्पेशालिस्ट गोलंदाज असणार आहेत. भारताने यंदा या स्पर्धेत आतापर्यंतचे चारही सामने जिंकले असून गुणतालिकेत ते न्यूझीलंडपाठोपाठ दुसर्या स्थानी आहेत.
हेही वाचा