पुढारी ऑनलाईन डेस्क ; महाविकास आघाडीचा मुंबईतील हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. या महामोर्चासाठी जोरदारी तयारी करण्यात आली होती. सत्तांतरानंतरचा विरोधकांचा हा पहिलाच एकत्रित मोर्चा आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह आघाडीसोबत असलेले छोटे पक्ष, पुरोगामी संस्था, संघटना रस्त्यावर उतरले आहेत आणि हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन आणि विरोधकांची एकजूट अधोरेखित केली. ('Halla Bol Morcha' MVA's) या मोर्चात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, नाना पटोले आणि अन्य इतर नेते सहभागी झाले आहेत.
महामोर्चा निघण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईमधील सेंट्रल हॉटेलमध्ये बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी या सभेला संबोधित केले. महामोर्चाला राज्यभरातून कार्यकर्ते आले आहेत. सभास्थळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
भाजपकडून महापुरुषांचा होणारा अवमान, सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची चिथावणीखोर भूमिका, महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाणे आणि लोकशाहीचे रक्षण आदी मुद्द्यांवर हा मोर्चा काढला जात आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हा मोर्चा काढला जात असून त्याने सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या ( 'Halla Bol Morcha' MVA's ) नेत्यांनी केले होते. शुक्रवारी पोलिसांनी काही अटी, शर्तीसह या मोर्चाला परवानगी दिल्याने गुरुवारपासूनचा संभ्रम दूर झाला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्या सुप्रिया सुळे या महामोर्चात सहभागी झाल्या आहेत. महामोर्चाविषयी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "राज्यपालांनी अद्याप दिलगिरी व्यक्त केलेली नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही एवढा हल्लाबोल करत असताना महाराष्ट्रातल्या कुणी काहीही केलं नाही. सगळे चुपचाप बसले होते. एखाद्याने कुठली चूक एकदा केली ठीक आहे, दोनदा केली तर ठीक आहे. पण पुन्हा पुन्हा चूक कशी होते? ती चॉईस असते, मग ती चूक नसते".
भाजपच्या मोर्चाला महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
तर जितेंद्र आव्हा़ड म्हणतं आहेत, राज्यपालांना हे सत्ताधीर हटवणार नाहीत. महापुरुष तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत की नाहीत? त्यांचा अपमान होत असताना तुमची भूमिका काय?
हेही वाचा