मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानावर शुक्रवारी करण्यात आलेला हल्ला हा नियोजित कट असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी साक्षीदार शोधण्यासोबत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधारे पोलीस अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वाढीव कोठडी मिळवण्यासाठी सोमवारी प्रयत्न करणार आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या 109 आंदोलकांनी वरिष्ठ न्यायालयात धाव घेतल्यास, पोलीस त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करणार आहेत.
भुलाभाई देसाई मार्गावरील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानात शुक्रवारी दुपारी घुसलेल्या 109 आंदोलनकर्त्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून गावदेवी पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण 110 जणांना अटक केली आहे. त्यांच्यात 23 महिलांसह 'सिल्व्हर ओक' परिसराची टेहळणी करणार्या चौघांचा समावेश आहे.
पोलिसांनी रविवारी सकाळी अॅड. सदावर्ते यांना लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून गावदेवी पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलीस उपायुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी रविवारी आझाद मैदान तसेच तेथून 'सिल्व्हर ओक'च्या दिशेने जाणार्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अटक केलेले आंदोलक दिसत असलेले चित्रीकरण पुरावा म्हणून
ताब्यात घेतले. त्याआधारे पोलीस अन्य संशयित आरोपी आहेत का, याचाही मागोवा घेत आहेत.
पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनचे तपशील मागवून ते कोणा-कोणाच्या संपर्कात होते, याचीही तपासणी सुरू केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या 109 आंदोलकांनी सोमवारी जामिनासाठी अर्ज केल्यास पोलिसांकडून विरोध करण्यात येईल. आरोपींना जामिनावर सोडल्यास ते पुन्हा अशाप्रकारचे कृत्य करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. त्याचप्रमाणे जामिनावर सुटल्यानंतर ते अन्य आरोपींना पळवून लावू शकतात, असा दावा पोलीस करणारत असल्याचे समजते.
पोलिसांनी अॅड. सदावर्ते यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आझाद मैदानात चिथावणीखोर भाषण केल्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ रेकॉर्डिंग तसेच आझाद मैदान पोलीस ठाण्यातील पाच अंमलदारांचेही जबाब सादर केले जाणार आहेत.
हे ही वाचलं का ?