Latest

नाशिक शहरात झळकले गुलशनाबादचे फलक, नव्या वादाला तोंड

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह उपनगरांमध्ये बकरी ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले. मात्र, सारडा सर्कल येथील बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर नाशिकऐवजी शहराचा गुलशनाबाद, असा उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. ‌या प्रकरणी पोलिसांकडून गंभीर पावले उचलली जात आहेत.

मुघल काळात नाशिकचे नाव गुलशनाबाद असे होते. मात्र, त्यानंतर पेशवाईच्या काळात गुलशनाबादचे नामकरण नाशिक असे करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.२९) सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर नाशिकऐवजी गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे.

कारवाई करणार

नाशिकमध्ये झळकलेल्या गुलशनाबाद नावाच्या फलकांवरून ना. भुसे यांनी संताप व्यक्त केला. ज्या कोणी हे कृत्य केले असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच लोकप्रतिनिधी व पोलिस विभागाशी चर्चा सुरू आहे. राज्याच्या विकासात बाधा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यात येईल, असा इशारा भुसे यांनी दिला.

 फलकावरील तो उल्लेख चुकीने

शहराचे नाव बदलण्यात यावे, अशी आमची मागणी किंवा विचारही नाही, ज्या शुभेच्छा फलकावर शहराचा उल्लेख 'नाशिक' असा झाला नव्हता ती फक्त एक मानवी चूक होती. नाशिक या नावाने आम्ही पूर्णतः संतुष्ट व खूश आहोत, यासंदर्भात किंचितही शंका नाही. सर्वांना सोबत घेऊन नाशिकचा सर्वांगीण विकास हाच आमचा उद्देश असून, अनावश्यक प्रश्नचिन्हांना पूर्णविराम लावण्याची गरज आहे, असे मत शिवसेना (उबाठा) युवानेत्या अदिना सय्यद यांनी व्यक्त केले.

सारडा सर्कल येथे ईदच्या शुभेच्छा देण्यास एका मित्रमंडळातर्फे शुभेच्छाफलक लावण्यात आला होता. यावर मंडळाच्या नावात गुलशनाबाद लिहिण्यात आले असताना नाशिकचा उल्लेख नसल्याने काही प्रश्न निर्माण झाले होते. त्यावर अदिना सय्यद यांनी स्पष्टीकरण देत फलक लावणाऱ्यांना भविष्यात अशी चूक होऊ नये यासाठी तंबी दिल्याचे सांगितले.

'नाशिक' हे नाव मराठी अस्मितेशी जोडलेले असून, ते बदलण्याची मागणी किंवा विचारही कुणी केलेला नाही. ज्यांनी शुभेच्छाफलक लावले होते त्यात झालेला उल्लेख त्यांची चूक असून, यासंदर्भात कोणताही उद्देश नव्हता.

अदिना सय्यद, युवानेत्या (शिवसेना) उबाठा

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT