Latest

Gold price : सोन्याने मारली मुसंडी; ७० पार केल्यानंतरही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवाढ अटळ

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरांनी उच्चांकी झेप घेतली असून, लग्नसराई आणि सणासुदीत दर आणखी गगणाला भिडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एप्रिल महिन्यात लग्नाचे चार मुहूर्त आहेत. याशिवाय गुढीपाडव्याचा मुहूर्त असून, या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. अशात जाणकरांच्या मते, या महिन्यात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

२४ कॅरेट सोन्याने ७१ हजाराचा आकडा पार केला असून, २२ कॅरेट सोने ६५ हजारांच्या उंबरठ्यावर आहे. अचानक सोन्यात आलेल्या या तेजीमुळे ग्राहकही आवाक असून, सोने खरेदी करताना हात आखडता घेतला जात आहे. मात्र, लग्नसराईत सोने-चांदी खरेदी करणे अगत्याचे असल्याने, यजमानांना चांगला फटका बसत आहे. गेल्या मार्च महिन्यात लग्नाचे आठ मुहूर्त होते. त्यामुळे सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग होती. या महिन्यात लग्नाचे चारच मुहूर्त असले तरी, ९ एप्रिल रोजी येणाऱ्या गुढीपाडव्यामुळे सराफ बाजार गजबजणार आहे. जाणकारांच्या मते, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २४ कॅरेट सोने ७५ हजारांच्या नजीक पोहोचण्याची शक्यता आहे. तर २२ कॅरेट सोने ७० हजारांचा आकडा गाठणार आहे. एकंदरीत या महिन्यात सोने दर उच्चांकी नोंद करू शकतात. दरम्यान, बुधवारी सोन्याचा दर २२ कॅरेट प्रति दहा ग्रॅमसाठी ६४ हजार १३० रुपये इतका नोंदविला गेला. हाच दर २५ मार्च रोजी ६१ हजार १४० रुपये इतका होता. म्हणजे अवघ्या दहा दिवसात दोन हजार ९९० रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरात देखील अवघ्या दहा दिवसात पाच हजार २२८ रुपयांची तेजी नोंदविली गेली आहे. बुधवारी २४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ७१ हजार ३२५ रुपये इतका दर नोंदविला गेला. तर २५ मार्च रोजी हा दर ६६ हजार ९७ रुपये इतका होता. सोन्याचा दर ज्या गतीने वाढत आहे, त्यावरून सोने लवकरच ७५ हजाराचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोन्याचे दर वाढत असले तरी, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने सराफ व्यावसायिकांकडून तयारी देखील केली आहे. काही सराफ व्यावसायिकांनी उत्कृष्ट ऑफर्स उपलब्ध करून दिल्या असून, काहींनी ऑनलाइन सोने खरेदीची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे.

चांदी ८० हजार पार
चांदीने विक्रमी दर नोंदवित ८१ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. बुधवारी चांदीचा दर प्रति १ किलोसाठी ८१ हजार रुपये इतका नोंदविला गेला. हाच दर गेल्या २५ मार्च रोजी ७७ हजार ८०० रुपये इतका होता. अवघ्या दहा दिवसात चांदी तीन हजार दोनशे रुपयांनी महागली आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीमध्ये गुंतवणूक वाढली असून, तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात चांदी खरेदी केली जात आहे.

अमेरिकेच्या रिजर्व फेडरल बँकेचे व्याजदर कमी केले जाणार असल्याने त्याचा परिणाम सोने दरवाढीवर होणार आहे. याशिवाय महागाई दर, बेरोजगारी, जागतिक मंदीचे सावट गडद होत असल्याने, सोने दरवाढीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे लवकरच सोने ७५ हजारांचा टप्पा गाठू शकेल. सोने दरवाढ होत असली तरी, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने, खरेदीचा उत्साह कायम आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा आहे. – चेतन राजापूरकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, आयबीजे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT