पणजी, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांत राज्यातील बहुतेक किनाऱ्यांवर तेलगोळे आले आहे. परिणामी, गोव्याचा (Goa) समुद्रकिनारा काळ्या तेलगोळ्यांनी व्यापलेला आहे. या तेलगोळ्यांमुळे पर्यटकांसहीत किनाऱ्यावर गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांनाही त्रास होत आहे.
मान्सूनपूर्व येणारे तेलगोळे आता सप्टेंबरमध्ये आल्याने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावेळी तेलगोळ्यांचा आकारही मोठा असल्याने गोवा किनारपट्टीवरून (Goa) चालण्यास त्रास होत आहे. याशिवाय रापणकारांनाही मासेमारी करताना याचा त्रास होत आहे. उत्तरेत पेडणे, बार्देश आणि तिसवाडी तालुक्यातील केरी, मोरजी, हनजुने, अश्वे, वागतोर, कांदोळी, मिरामार, शिरदोन किनारी तर दक्षिणेत मुरगाव, सासष्टी तालुक्यातील माजोर्डा, वेळसाव , बाणावली, उतोर्डा किनारी तेलगोळे आले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती केरकर सांगतात की, "राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने केलेल्या एका अभ्यासानुसार तेलगोळे हे प्रामुख्याने समुद्रातील मोठ्या जहाजांमुळे येतात. मध्यपूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया खंडात मालवाहतूक तसेच तेलवाहतूक करणारी जहाजे मे आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस स्वच्छ केली जातात."
"यावेळी जहाजे गरम पाण्याने धुतली जातात. यामुळे पाण्यावर तेलाचे तवंग निर्माण होतात. नंतर समुद्रातील हालचालींमुळे ते एकत्र येऊन त्याचे गोळे बनतात. वाऱ्यामुळे हे गोळे लाटांसोबत किनाऱ्याला धडकतात."
"याशिवाय मुंबई येथील तेल काढण्याच्या प्रकल्पातूनही मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची गळती होत असते यामुळेही तेलगोळ्यांची समस्या जटील बनली आहे. तेलगोळे माणसांप्रमाणे समुद्री जीवांनाही धोकादायक आहेत. यामुळे समुद्री पक्षांच्या पंखांवर तेल चिकटून राहते आणि त्यांना उडणे कठीण जाते. तेलगोळ्यांमुळे काही समुद्रीजीवांना श्वास घेणे कठीण होते."
"याशिवाय काही जलचर वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणात अडथळा निर्माण होतो. किनारे म्हणजे राज्याची शान आहेत, ते स्वच्छ असायलाच हवेत. किनाऱ्यांची चांगली स्वच्छता केली नाही तर त्याचा त्रास नागरिकांना आणि स्थानिकांनासुद्धा होईल", अशीही माहिती केरकर यांनी दिली.
गोव्याचे आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष व्हीन्सी व्हिएगस म्हणतात की, "सरकार पर्यावरणकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. यामुळेच समुद्र किनारी तेलगोळे येऊन ते विद्रुप होत आहेत. याचा विपरीत परिणाम पर्यटनावर तर होतोच शिवाय स्थानिकांनाही त्रास होत आहे. इतर देशात समुद्र किनाऱ्यावर कधीही तेलगोळे आलेले मी पाहिलेले नाहीत. सरकारने याकडे त्वरित लक्ष घालणे गरजेचे आहे."
पहा व्हिडीओ : धनंजय महाडिक यांच्या घरचा गणेशोत्सव