गोवा

प्रियोळ मतदारसंघ : दोन माजी मंत्र्यांत रंगणार राजकीय संग्राम; विकासाबरोबर ‘जात फॅक्टर’ही प्रभावी

सोनाली जाधव

प्रयोळ मतदारसंघात तीन उमेदवारांत राजकीय लढत होणार आहे. सत्तेच्या सारिपाटात कोण जिंकतो याबाबत उत्सुकता आहे. मतदारसंघात विकासकामांव्यतिरिक्त जातीच्या मुद्द्यावरूनही राजकीय संग्राम होणार आहे. प्रियोळ मतदारसंघातून आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात माजी आमदार व माजी मंत्र्यांचाही समावेश आहे.
गेल्या निवडणुकीतील विजयी माजी मंत्री गोविंद गावडे हे भाजपच्या उमेदवारीवर, माजी मंत्री दीपक ढवळीकर हे मगो पक्षाच्या तिकिटावर, दिनेश जल्मी हे काँग्रेसच्या तिकिटावर, आम आदमी पक्षातर्फे नोनू नाईक, रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे विश्‍वेश नाईक, दिग्विजय वेलिंगकर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, संदीप निगळ्ये अपक्ष, तसेच दत्ताराम शेटकर यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आठ उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे.

गेल्या 2017 च्या निवडणुकीत मगो पक्षाचे उमेदवार दीपक ढवळीकर व अपक्ष आणि भाजपने पाठिंबा दिलेले गोविंद गावडे यांच्यातच खरी लढत झाली होती. भाजपचे समर्थन लाभल्याने गोविंद गावडे यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. प्रियोळता अपेक्षेप्रमाणे विकास झाला नसल्याचा मुद्दा घेऊनच गोविंद गावडे निवडणुकीत उतरले होते. त्यामुळे असंतुष्ट गटाच्या लोकांनी गोविंद गावडे यांना निवडून आणले होते. आता स्थिती वेगळी आहे. गोविंद गावडे आमदार झाल्यानंतर मंत्रीही झाले. त्यांनी आपल्यापरीने विकासही केला; पण तो पुरेसा नाही. उद्योजक संदीप निगळ्ये यांनी भाजपतर्फे उमेदवारीचा दावा केला होता. पण त्यांना डावलून गोविंद गावडे यांना तिकीट दिल्याने त्यांनी आपल्या समर्थकांसह वेगळी चूल मांडली. प्रियोळ मतदारसंघात काँग्रेसचे कार्य तसे मोठे नाही. परंतु कार्यक्षम उमेदवार दिनेश जल्मी, तसेच आम आदमी पक्षाचे बिनधास्त आणि तडफदार उमेदवार नोनू नाईक, राज्यभर गोमंतकीयत्वाचा मुद्दा घेऊन वादळ निर्माण केलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे विश्‍वेश नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिग्विजय वेलिंगकर आदींनी आपले आव्हान कायम ठेवले आहे.

प्रचारात गाजणारे मुद्दे…

  • प्रियोळ मतदारसंघ हा शेती बागायतीचा प्रदेश आहे. या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे, त्यामुळे वीज, पाणी, रस्त्यांच्या मूलभूत सुविधांबरोबरच रोजगाराचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे.
  • केरी – भूतखांब पठारावर औद्योगिक वसाहतीची मागणी
  • रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांबाबत आवाज
  • माशेल भागात अधिक सुविधा उपलब्ध करण्याची गरज
  • रवींद्र भवनची मागणी
  • युवा वर्गाला रोजगाराच्या संधी देण्याची मागणी
  • पंचायत पातळीवर विकासाची गरज

मते विभागून जाणार

प्रियोळ मतदारसंघात स्थानिक विरुद्ध मतदारसंघाबाहेरील उमेदवार असा लढा झाला तर कदाचित संदीप निगळ्ये यांच्या पथ्यावर पडू शकते. पण, माजी मंत्री गोविंद गावडे व दीपक ढवळीकर यांनी विकासावर भर दिला आहे. आपल्या आमदारकीच्या काळात प्रियोळ मतदारसंघात अनेक विकासकामे झाल्याचा दावा या दोघांनीही केला आहे. लोकल फॉर व्होकलचा नारा दुय्यम असल्याचे त्यांचे मत आहे. त्यातच गोविंद गावडे यांनी आपले मत मडकई मतदारसंघातून हलवून प्रियोळ मतदारसंघात आणले आहे. मात्र त्याबाबतही वाद असल्याने ही युक्ती कितपत उपयोगी पडते ते निवडणुकीतच कळणार आहे.

विकासकामांचेे मुद्देही ऐरणीवर

प्रियोळमध्ये मतदारसंघात लोकल फॉर व्होकलचा मुद्दा गाजत आहे. गेली तीन निवडणुका येथे मतदारसंघाबाहेरील उमेदवाराला निवडून देण्यात आले. मात्र, स्थानिक उमेदवार पंधरा वर्षे प्रियोळात नसल्याने खर्‍या अर्थाने प्रियोळात कुणीच पात्र उमेदवार नाही काय, असा दावा करीत लोकल फॉर व्होकलचा नारा स्वाभिमानी प्रियोळकरांनी दिला आहे. हा दावा जर प्रबळ ठरला तर भाजपचे गोविंद गावडे व मगोचे दीपक ढवळीकर यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. स्थानिक उमेदवार म्हणून संदीप निगळ्ये यांना जर मतदारांची पसंती मिळाली तर यावेळेला चित्र वेगळेच दिसेल. याशिवाय प्रियोळ मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने इतर विकासकामांबरोबरच हे मुद्देही ऐरणीवर आले आहेत.

पाहा व्हिडिओ : भारताची मेक इन इंडियाकडे वाटचाल : केंद्रीय अर्थसंकल्पावर विजय भंडारी यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT