गोवा

दाबोळी विमानतळ : ‘दाबोळी’चा विस्तार 2023 पर्यंत पूर्णत्वास ; गगन मलिक 256 कोटींचा प्रकल्प

मोनिका क्षीरसागर

वास्को : पुढारी वृत्तसेवा
पर्यटन हंगामावर कोव्हिड ओमायक्रॉन तसेच इतर गोष्टींचा परिणाम झाल्याने विदेशी पर्यटकांची संख्या घटली आहे. पुढील पर्यटन हंगामापर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक गगन मलिक यांनी व्यक्‍त केली. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आलेला दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 256 कोटींच्या विस्तार प्रकल्पाचे काम 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वर्षाकाठी सुमारे एक कोटी 30 लाख प्रवासी हाताळण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या दाबोळी विमानतळ प्रकल्प सुमारे 64 हजार चौरस मीटर क्षेत्रफळचा आहे. त्यामध्ये अतिरिक्‍त 18 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या विस्तारित प्रकल्पाची भर पडणार आहे. जून 2021 मध्ये संचालक गगन मलिक यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला होता. या प्रकल्पाचे बांधकाम सध्या वेगात सुरू आहे. यापूर्वी नव्याने उभारण्यात आलेल्या दाबोळी विमानतळ इमारतीसाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. विस्तार प्रकल्पामुळे दाबोळी विमानतळावला नवीन ऊर्जा लाभेल. सध्या दाबोळी विमानतळाच्या टर्मिनलवर सुमारे 80 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. मात्र, काही वेळा तेथे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी हाताळले जातात. नवीन टर्मिनलमधील अत्यानुधिक गोष्टींमुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये मोठी बचत होणार आहे.

दाबोळी विमानतळावर अधिकाअधिक चांगली सेवा व सुविधा प्रवाशांना मिळावी, यासाठी आमचे सतत प्रयत्न चालले असतात. या विमानतळावर कोणत्या सुविधा असाव्यात, कोणत्या सुधारणा करू शकतो यासंबंधी प्रवाशांचेही मते विचारात घेतली जातात. आमचे अधिकारी व कर्मचारी वर्ग स्वतःला प्रवासी समजून विमानतळावरील उणीवा शोधतात. त्यामुळे दाबोळी विमानतळावरील सुविधामध्ये मोठी सुधारणा होऊ लागल्याची माहिती मलिक यांनी दिली.
दाबोळी विमानतळावरील बहुमजली पार्किंग इमारत विनावापर आहे.

सुरक्षितेच्या द‍ृष्टीने काही त्रुटी या इमारतीमध्ये आढळल्याने ती कार्यान्वित करण्यासाठी नागरी उड्डाण सुरक्षाकडून हिरवा कंदील मिळाला नव्हता.त्यामुळे ती इमारत चर्चेचा विषय झाला होता. मात्र, आता त्या इमारतीसंबंधी सर्व सोपस्कार करण्यात आले आहे. एकंदर सुरक्षेसंबंधी संबंधितांकडून योग्य ती तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या इमारतीचा वापर सुरू होईल. दाबोळी टर्मिनल इमारतीसमोरच्या मोकळ्या जागेसंबंधी योग्य ती प्रक्रिया सुरू झाली आहे. तेथेही पार्किंग व्यवस्था करता येईल. तेथे कार्गो विकास करता येईल. तेथे नागरी उड्डाण सुरक्षा संस्था उभारता येईल. जेणेकरून स्थानिकांना तेथे प्रशिक्षण देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT