सध्याच्या वातावरणाचा आंबा मोहराला फटका बसण्याची भीती  
गोवा

आंबा बागायतदार : बागायतदारांमध्ये चिंता वाढली  ; आंबा, काजू मोहरावर ‘टी मॉस्किटो’ प्रादुर्भाव 

मोनिका क्षीरसागर

वाळपई : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील आंबा, काजूला बर्‍यापैकी मोहर आला आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासून काही प्रमाणात पडणार्‍या धुक्यामुळे बागायतदारांत चिंता वाढली आहे. आंबा व काजू पिकावर टी मॉस्किटो हा जंतू हल्ला करू लागला असून, याचा प्रभाव कमी न झाल्यास आंबा व काजू उत्पादन धोक्यात येणार असल्याची भीती बागायतदारांत निर्माण झाली आहे.

सध्या आंबा व काजूच्या झाडांना आलेला मोहर लक्षात घेता बागायतदारांच्या हातामध्ये चार पैसे अधिक येण्याची शक्यता आहे. गोव्याच्या कृषी उत्पादनात आंबा व काजूला विशेष महत्त्व आहे. सत्तरी तालुक्यात जवळपास 70 टक्के कुटुंबे आंबा व काजू उत्पादनावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. यंदा जवळपास 80 टक्के काजूच्या झाडांना चांगला मोहर आलेला दिसून येत आहे तर काहींना मोहर येण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याचे दिसत आहे.
सध्या आंबा व काजू झाडांना आलेला मोहर पाहता या उत्पादकांना चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या बाजारपेठेत काजूचा दर प्रति किलो 120 ते 125 रुपये आहे. मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे काही प्रमाणात काजुच्या झाडांना मोहर येण्याची प्रक्रिया लांबली. मात्र, पाऊस गेल्यानंतर काजू झाडांना अचानकपणे भरभरून मोहर आल्याचे चित्र पहावयास मिळाले तर आंब्याच्या झाडांना त्याच्यापेक्षा जास्त मोहर आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

धुक्यामुळे वाढली चिंता

आंबा व काजू झाडाला मोठ्या प्रमाणात मोहर आला असला तरी गेल्या चार दिवसांत काही प्रमाणात धुके पडत आहे. या धुक्याचा परिणाम या मोहरावर होण्याची शक्यता आहे, तसे झाल्यास उत्पादन घटणार आहे. ही सर्व प्रक्रिया हवामानावर अवलंबून आहे. वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांच्या म्हणण्यानुसार या मोहरावर आत्ताच जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे आहे. हवामानात बदल झाल्यास व धुक्याचे प्रमाण वाढल्यास या मोहरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. जंतुनाशक औषधांची फवारणी केल्यास ही प्रक्रिया काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते; अन्यथा संपूर्ण मोहर नष्ट, होण्याची भीती आहे, असे गावस यांनी सांगितले.

जंतुनाशक फवारणी करा : गावस

सत्तरी तालुक्यात काही भागांत आंबा व काजू झाडांच्या मोहरावर टी मॉस्किटो नामक जंतू हल्ला करू लागला आहे. त्यामुळे मोहर गळू लागला आहे. टी मॉस्किटो मोहरावर हल्ला करतात व रस शोषून घेतात. त्यामुळे जैविक शक्‍ती नष्ट होऊन मोहर जळण्याची प्रक्रिया सुरू होते. सध्या ज्या झाडांना पाणी देणे शक्य आहे त्या झाडांना पाण्याची प्रक्रिया सुरू ठेवल्यास पुन्हा त्या जागी नवीन मोहर येण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा ज्या झाडांना ताजा मोहर आहे त्या झाडावर ताबडतोब जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे असल्याचे असे वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT