पणजी : पुढारी वृत्तसेवा
वातावरणातील बदलामुळे गेले काही दिवस राज्यातील तापमानात वाढ झाली असून, हवामान खात्याने मंगळवारी (दि. 8 ) आणि बुधवारी (दि.9) यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात या दोन दिवसात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे. 10 मार्च रोजी कोणताही अलर्ट दिला नसला तरी या दिवशी पावसाच्या तुरळक सरी पडण्याचा अंदाज आहे.
या दोन दिवसात वार्याचा वेग ताशी 35 ते 45 किमी असणार आहे. वार्याचा वेग वाढून ताशी 55 किमीपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न उतरण्याचे आवाहन खात्याने केले आहे. हवामान खात्यानुसार, 1 मार्च ते 31 मे हा कालावधी मान्सूनपूर्व समजला जातो. या काळात वार्याच्या , तापमानाच्या आणि आर्द्रतेच्या प्रकारात बदल होतात. यामुळे ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
रविवारी पणजीचे कमाल तापमान 34.1 डिग्री सेल्सियस, तर किमान तापमान 21डिग्री सेल्सियस होते. येत्या तीन-चार दिवसांत कमाल तापमानात फारसा बदल होणार नसला तरी किमान तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सियसने वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. रविवारी पणजीमध्ये सापेक्ष आर्द्रता 63 टक्के इतकी होती.