सांगली पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेला प्रभाग समिती सभापतीपदांच्या निवडणुकीचा विसर पडल्याचे दिसत आहे. अकरा महिने सरले तरी अद्याप चार प्रभाग समितींच्या चार सभापतिपदांची खुर्ची रिकामीच आहे. प्रभाग समित्या पुनर्रचनेचे मार्गदर्शनही नगरविकास विभागाकडे लटकले आहे.
'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या स्थायी समिती, विषय समिती सभापती व सदस्यांच्या निवडणुका नगरविकास विभागाने दि. 9 एप्रिलच्या परिपत्रकान्वये पुढे ढकलल्या. त्यामुळे सांगली महापालिकेच्या प्रभाग समितींच्या चारही सभापती पदासाठीची निवडणूक लांबणीवर गेली.
महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 ची सभापतीपदे दि. 31 मार्च 2021 पासून रिक्त आहेत. अकरा महिने होऊन गेले तरी अद्याप निवडणुकीच्या हालचाली नाहीत. मध्यंतरी स्थायी समिती सभापती, समाजकल्याण समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदांसाठी निवडणूक झाली. प्रभाग समिती सभापतींची निवडणूक मात्र रखडली आहे.
महानगरपालिकेत 'काँग्रेस-राष्ट्रवादी' आघाडीने महापौर, उपमहापौरपद भाजपकडून खेचून घेतले आहे. प्रभाग समित्यांची सभापतीपदेही खेचून घेण्यासाठी प्रभाग समित्यांची पुनर्रचना केली. भाजपने या पुनर्रचनेला हरकत घेतली, तर 'काँग्रेस-राष्ट्रवादी'ने ही पुनर्रचना कायदेशीर असल्याचा दावा केला. त्यावर पुनर्रचना योग्य की अयोग्य याबाबत महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी नगरविकास विभागाकडून मार्गदर्शन मागविले आहे. हे मार्गदर्शनही अद्याप शासनाकडून आलेले नाही.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा 'अनलॉक' केला आहे. त्यामुळे आतातरी महापालिकेच्या प्रभाग समितींच्या 4 सभापतीपदांसाठीची निवडणूक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महानगरपालिकेत एकूण चार प्रभाग समित्या आहेत. महानगरपालिकेच्या सन 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. तीन प्रभाग समितींची सभापतीपदे भाजपकडे, तर एका प्रभाग समितीचे (प्रभाग समिती क्रमांक 3) सभापतीपद काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आले. महानगरपालिकेत 'सत्तापरिवर्तना'नंतर (23 फेब्रुवारी 2021) काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रभाग समित्यांची पुनर्रचना केली. भाजप फुटीर नगरसेवकांच्या बळावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे तीन व भाजपकडे एक प्रभाग समिती सभापतीपद राहील, अशा पद्धतीने प्रभाग समित्यांची पुनर्रचना केली आहे.