पणजीः पुढारी वृत्तसेवा
हा अर्थसंकल्प भाजप सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल. कारण गोव्यातील लोक आपल्या राज्याला उद्ध्वस्त केल्याबद्दल भाजपला पुन्हा कधीही सत्ता देणार नाहीत आणि त्यांच्या अहंकार, लोकविरोधी प्रकल्प आणि लोकशाहीवरील अत्याचारांसाठी त्यांना बाहेरचा दरवाजा दाखवतील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी सांगितले.
आलेमाव म्हणाले की, हे सरकार कर्ज घेण्यावर आणि कर्ज फेडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ते पोकळ आश्वासने देते आणि करदात्यांच्या पैशांचा कमिशनसाठी कार्यक्रमांवर खर्च करते.
मंत्री आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचार, ३९ (अ) सह जमिनींचे रूपांतरण, कॅसिनो हटवणे, सार्वजनिक कर्जावरील नियंत्रण आणि सार्वजनिक कर्ज कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे," असेही आलेमाव म्हणाले.
आलेमाव म्हणाले की, सत्तेत आल्यानंतर काँग्रेस उद्योग आणि सेवा क्षेत्रातील रोजगार, कौशल्य आणि रोजगारासाठी शिक्षण, व्यवसाय सुलभता आणि नागरिकांची सुलभता आणि पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यावर लक्ष केंद्रित करेल.
भाजप मंत्रिमंडळातील एक मंत्री सत्तरीहून ४० हजार लोकांना आणून राजधानीला जॅम करण्याची उघड धमकी देत आहेत. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अशा धमक्यांवर मौन बाळगताहेत. दुसरीकडे सामान्य लोक त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावर एफआयआर दाखल करताहेत, असेही आलेमाव यांनी सांगितले.