मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कधी भ्रष्टाचार तर कधी चौकशीत हयगय अशा विविध कारणाने गाजत असलेल्या गोवा पोलिसांचे नवीन प्रताप समोर आले आहेत. सासष्टी तालुक्यातील एका पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षकाकडून त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या महिला उपनिरीक्षकाचा छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
सदर उपनिरीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्याने त्या पोलिस निरीक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे पोलिस खाते पुन्हा चर्चेत आले असून त्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास महिला उपनिरीक्षकाच्या नातेवाईकांना घेऊन दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा बायलांचो एकवोटच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी दिला आहे. ज्या पोलिसांवर समाज विश्वास ठेवून आहे तसेच ज्यांच्या विश्वासावर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अवलंबून आहे, अशा पोलिसांकडून अशा स्वरूपाचे कृत्य करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही त्या म्हणाल्या.
अधीक्षकांकडे तक्रार नोंद :
आवदा दरम्यान, याबाबत प्राप्त माहितीप्रमाणे, सदर महिला उपनिरीक्षकाने दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांच्याकडे सतावणुकीची तक्रार नोंद केली आहे. त्या महिला उपनिरीक्षकाला न्याय न मिळाल्यास तिच्या कुटुंबाला घेऊन दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर समोर ठाण मांडू, असा इशारा बायलांचो एकवोटच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी दिला आहे.