पणजी : पुढारी वृत्तसेवा रविवारी गोव्यात आयोजित एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केल्याने गौतम खट्टर चर्चेत आले आहेत. त्यानंतर कोण आहेत हे गौतम खट्टर अशी विचारणा सुरू झाली आहे.
डॉ. गौतम खट्टर हे सनातन संघ किंवा सनातन महासंघाचे संस्थापक आहेत. 4 फेब्रुवारी 2000 रोजी उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेले खट्टर स्वत:ला आध्यात्मिक पत्रकारही म्हणवून घेतात. सनातन धर्म विचारवंत, वेदिक स्कॉलर अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी हरिद्वारमधील गुरुकुल कांग्री विद्यापीठातून योग विषयात बीएचे शिक्षण घेतले. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनमधून त्यांनी एमए केले. वेदिक साहित्यात त्यांनी पीएचडी केली आहे.
सनातन महासंघ या त्यांच्या संस्थेचा उद्देश धर्मरक्षण, वेदिक शिक्षण, गोरक्षण, मंदिर पुनर्निर्माण हा आहे. सनातन धर्मावर ते भाषणे देत असतात. सोप्या शब्दांत भगवद्गतीना समजावण्यासाठी त्यांनी ‘भगवद्गगीता गीता सार’ हे पुस्तक लिहिले आहे. ते एक प्रसिद्ध यू ट्यूबर असून साधू, सनातन धर्म यावर कण्टेण्ट तयार करत असतात. सनातन महासंघातर्फे ते धार्मिक शिबिरे भरवतात.
वेदिक स्कॉलर म्हणून गोव्यात त्यांना एका कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी इतर धर्मियांच्या भावना दुखावणारे विधान करताच त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा अशी मागणी वाढत आहे. आयोजकांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली आहे. सोशल मीडियावर त्यांचे एकूण तीस लाख फॉलोवर्स आहेत. त्यात इन्स्टाग्रामवर 19 लाख, यू ट्यूबवर 90 लाख, एक्सवर 93000 एवढे लक्षणीय फॉलोविंग आहे.