साखळी : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारच्या कृषी खात्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना, सोयीसुविधा व मार्गदर्शन यामुळे शेतकरी एकाच शेतात कितीतरी प्रयोग करून ते यशस्वी करू शकतात. याच प्रायोगिक तत्त्वावरील शेती शेतकऱ्यांना लखपतीही बनवू शकते. याचे एक ज्वलंत उदाहरण राज्यासमोर ठेवले आहे साखळी मतदारसंघातील मायणा-न्हावेली येथील प्रगतिशील शेतकरी विश्वंभर गावस यांनी.
आपल्या एक एकर शेतात शेगुल व भेंडी यांची एकत्रित लागवड करून घेतलेल्या पिकाला यश आले आहे. या पिकांमधून त्यांना १ लाख रुपयांचा वर नफा झालेला आहे. स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेला बळ देणारी ही शेतातील नवीन संकल्पना असून शेतकऱ्यांनी अशा प्रयोगांचा अवलंब केल्यास एकापेक्षा अधिक पिके शेतकरी मिळवू शकतात, हेच या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
विश्वंभर गावस यांनी आपल्या एक एकर शेत जमिनीत शेगुलाची झाडे लावली होती, त्यातच अंतर्गत लागवड म्हणून भेंडीचे रोपे लावले होते. भेंडीच्या झाडांना लागवडीनंतर ८० ते ८५ दिवस झाल्यानंतर पहिले पीक मिळाले. तर या भेंडीच्या रोपांचे पहिले पीक सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळाले.
सुमारे अडीच टन भेंडीचे पीक या शेतातून हाती लागले. त्यातून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा नफा झाला. त्याचबरोबर शेगुलाच्या झाडांचे ट्रिमिंग करून शेगलांचा पाला लोकांना चतुर्थी काळात भाजीसाठी वापरात आणण्यात आला.
तर राहिलेल्या पानांची पावडर बनवून 'मोरिंगो पावडर' म्हणून एक औषधी उत्पादन बाजारात आणले आहे. या मोरिंगो पावडरलाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच मागणी आहे. त्यामुळे अशा या नवीन प्रायोगिक तत्त्वावरील लागवडीचा दुहेरी-तिहेरी लाभ शेतकरी घेऊ शकतात, असे विश्वंभर गावस यांनी सांगितले.
नवीन तंत्रज्ञानाचा लाभ : कृषी अधिकारी गावस
सरकारचे कृषी खाते शेतकऱ्यांना शेतात उतरून काम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. नवनवीन तंत्रज्ञान व रोप, बियाणे लागवडीच्या पद्धती अवलंबल्या जात असून त्याचा चांगला लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. या नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करून तसेच कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ उठवत प्रगत शेतीत लक्ष घालावे, ज्यामुळे कमी मेहनतीत ज्यादा नफा कमविण्याची संधी उपलब्ध होणार, असे यावेळी डिचोली विभागीय कृषी अधिकारी यशवंत गावस यांनी सांगितले.
भेंडी व शेगलांच्या पाल्यातून लाखोंचा नफा
शेगुलाच्या झाडांना शंभर दिवस होताच त्यांचे ट्रिमिंग करून मुख्य फांद्या कापण्यात आल्या. त्यातून या झाडांना नवीन फांद्या आलेल्या आहेत. त्या फांद्यांवर आता पुन्हा फुलधारणा व भेंडे येऊ लागल्या आहेत.
राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेला बळ देताना शेतकऱ्यांनी जर सरकारच्या विविध योजना व सोयीसुविधांचा लाभ उठवला, तर शेतकरी-यांना आपल्या मातीत राहून सन्मानाचे जीवन जगण्याची आज संधी आहे. आपल्या न्हावेली येथील शेतात केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून येणाऱ्या काळात याच भेंडे व शेगुलाच्या लागवडीतून अधिक नफा मिळणार आहे, असे शेतकरी विश्वंभर गावस यांनी सांगितले.
"या शेतकामात वेदांत कंपनीच्या सामाजिक जबाबदारीतून 'वनराई' ग्राम निर्माण प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य व मदत पुरवली जाते. आमोणा, न्हावेली या भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वनराईचे सहकार्य लाभते."- परशुराम गायकर, प्रतिनिधी, वनराई
न्हावेली येथे विश्वंभर गावस यांनी केलेल्या शेतीच्या नवीन प्रयोगाला चांगले फळ मिळाले आहे. शेगलाची रोपे तीन मीटर अंतरावर, तर त्यामुळे ९० सेंटिमीटर अंतरावर भेंडीची रोपे लावण्यात आली होती. या भेंडी लागवडीचे भरघोस असे एक पीक घेतल्यावर या रोपांची मुख्य फांदी कापल्याने त्या रोपांना आता नवीन फांद्या व फुले आली आहेत.
नवीन भेंडी यायला सुरुवात झाली आहे. त्याचे चांगले पीक येणाऱ्या काळात त्यांना पुन्हा मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेगुलाच्या झाडांचीही ठराविक अंतरावर फांद्या कापल्याने त्यांनाही नवीन पालवी व फांद्या आलेल्या आहेत, त्यांना आता फुले येऊन लवकरच शेगाही लागणार आहेत. त्यामुळे याही लागवडीतून पीक व नफा मिळण्यास सुरुवात होणार, असे कृषी अधिकारी यशवंत गावस यांनी सांगितले.