Vijay Sardesai Pudhari Photo
गोवा

Vijay Sardesai | विजय-गिरीश यांचे 'मिले सूर मेरा तुम्हारा! गोव्यात युती बळकट करण्याचा काँग्रेस अन् गोवा फॉरवर्डचा निर्धार"

Vijay Sardesai | युती बळकट करण्याचा निर्धार ; सामूहिक ध्येयासाठी त्यागाची तयारी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कॉकरोचला मते मिळतील; पण काँग्रेसला मते मिळणार नाहीत, असे विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी करून २४ तास उलटायच्या आत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि सरदेसाई यांच्यात युतीबाबत बैठक व सकारात्मक चर्चा झाली. त्यांची ही बैठक तूर्तास तरी 'मिले सूर मेरा तुम्हारा'वाली होती असेच म्हणावे लागेल.

अखेर युतीचा मार्ग प्रशस्त करत चोडणकर यांनी शनिवारी सरदेसाई यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या कारभारामुळे गोव्यासमोर निर्माण झालेल्या विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

राज्यातील सध्याची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती व जनतेसमोर उभ्या ठाकलेल्या विविध समस्यांबाबत विचारविनिमय झाला. गोव्याला जनतेच्या हिताचा, विरोधी पक्षांमध्ये अधिक प्रभावी समन्वय आणि एकजूट निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आले.

दोन्ही पक्षांची युती गोव्याच्या हितासाठी अधिक पूरक आणि सक्षम करण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी केला. लवकरच भविष्यातील संयुक्त कृती आराखडा निश्चित करण्याचे दोन्ही नेत्यांनी ठरविले. चोडणकर यांनी सांगितले की, कोणतीही युती केवळ राजकीय गणितावर यशस्वी होत नाही.

शिस्त, परस्पर आदर, युती धर्माचे पालन आणि सामूहिक ध्येयासाठी आवश्यक त्याग करण्याची तयारी या मूल्यांवरच युतीचे यश अवलंबून असते. गोव्याच्या जनतेच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हीच तत्त्वे आमच्या युतीचा पाया राहील.

दोन्ही नेत्यांनी जनविरोधी धोरणांमुळे भाजप सरकारबाबत जनतेमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीवादी आणि समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला.

ही बैठक गोव्यातील विरोधी पक्षांच्या एकजुटतेला नवी दिशा देणारी आहे. जनतेसमोर स्थिर, प्रगतिशील राजकीय पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण प्रारंभ असल्याचे दोन्ही नेत्यांनी जाहीर केले.

लवकरच औपचारिक चर्चेची प्रक्रिया : चोडणकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, आजची चर्चा अत्यंत सकारात्मक, विधायक आणि भविष्योन्मुख होती. गोव्याच्या व्यापक हितासाठी आमची युती अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गोव्याला पारदर्शक, उत्तरदायी, लोकाभिमुख आणि जनहिताला प्राधान्य देणारा सक्षम पर्याय देण्यासाठी लवकरच औपचारिक चर्चेची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

निर्णयाच्या केंद्रस्थानी जनता : सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई यांनी ट्विट करून सांगितले की, आमच्या काणकोण अधिवेशनात दिलेल्या वचनानुसार, मी आज चोडणकर यांच्याशी चर्चा सुरू केली. ही बैठक सौहार्दपूर्ण, विधायक आणि पुढील वाटचालीवर केंद्रित होती. गोव्याच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, विरोधी पक्षांच्या एकतेच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. हा आराखडा पारदर्शकपणे सामायिक केला जाईल आणि प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी गोव्याची जनता राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT