पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त करताना झुरळांना मतं मिळू शकतात, काँग्रेसला नाही, अशी टीका केल्याने या दोन पक्षांत पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी पक्षाच्या बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना सरदेसाई यांनी काँग्रेस आगामी निवडणुकीसाठी युती करण्यास स्वारस्य दाखवत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत वरील टीका केली.
आमदार सरदेसाई म्हणाले की, काँग्रेसने युतीबाबत अशीच चालढकल केली तर गरज पडल्यास गोवा फॉरवर्ड पार्टी विधानसभेच्या सर्व ४० जागा लढवण्यासाठी तयार आहे आणि पक्ष केवळ सशक्त व पात्र उमेदवारच उभे करेल. लोक आता शहाणे झाले असून काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, “झुरळांनाही मते मिळू शकतात, पण काँग्रेसला नाही.
सरदेसाई यांनी पुढे सांगितले की आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्यासाठी पक्षाने काम सुरू केले असून येत्या काळात पक्ष अथक प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी काँग्रेसवर टीका केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सरदेसाई यांच्या सोबत शनिवारी आपण बैठक घेऊन चर्चा केल्याची माहिती चोडणकर यांनी दिली.