Vijai Sardesai vs Damu Naik 
गोवा

Vijai Sardesai vs Damu Naik | विजय सरदेसाई-दामू नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप

Vijai Sardesai vs Damu Naik | फातोर्ड्यातील राजकारण तापले ; जमीन, रोजगार प्रश्नांवरून जोरदार शाब्दिक चकमक

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुका जवळ येत असताना फातोर्डा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विद्यमान आमदार विजय सरदेसाई आणि माजी आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची शाब्दिक चकमक पुन्हा पेटली आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किंमतीत संपादित केल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी दामू नाईक यांच्यावर केल्यानंतर नाईक यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत हे आरोप पूर्णपणे पायाहीन असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आमदार म्हणून स्वतःचे अपयश झाकण्यासाठी विजय सरदेसाई दुसऱ्यांवर आरोप करत असल्याचाही पलटवार त्यांनी केला.

आपण कोणत्या शेतकऱ्याची जमीन संपादित केली किंवा संपादनासाठी नोटीस काढली, हे विजय सरदेसाई यांनी जनतेसमोर जाहीर करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी केले. कोणताही पुरावा नसताना अशा प्रकारचे आरोप करून लोकांची दिशाभूल करू नये. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीत घेतल्याचा आरोप हा केवळ राजकीय हेतूने करण्यात आल्याचा दावा ही त्यांनी केला.

सरदेसाई यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नाईक यांनी जर खरोखरच चार पटींच्या किमतीत जमिनी घेतल्या होत्या, तर फातोर्ड्याचे आमदार म्हणून विजय सरदेसाई यांनी त्या जमिनी परत शेतकऱ्यांच्या नावे करून द्यायला हव्या होत्या. मात्र, तसे न करता आता निवडणुकीच्या तोंडावर आरोप करण्याचे राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

रोजगाराच्या मुद्द्यावरही नाईक यांनी विजय सरदेसाई यांच्यावर निशाना साधला.
आपल्या कार्यकाळात कोणाला नोकऱ्या मिळाल्या याचा गाजावाजा करण्याची गरज नसल्याचे सांगत, ज्या ६०० युवकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांचा सार्वजनिक सत्कार करून जनतेसमोर माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. रोजगाराच्या विषयावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

दामू नाईक यांनी विजय सरदेसाई यांना उद्देशून, मला माझे काम शिकवण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाध्यक्ष म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडत आहोत. मात्र, गेली पंधरा वर्षे फातोर्डा मतदारसंघाचे आमदार, तसेच मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या विजय सरदेसाई यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते.

सरकारने केलेल्या विकासकामांचे श्रेय स्वतः घ्यायचे आणि अपयश आले की दोष दुसऱ्यांवर टाकायचा, हे त्यांचे राजकारण असल्याची टीकाही त्यांनी केली. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नावरही नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. हे रुग्णालय केवळ फातोर्ड्यासाठी नसून संपूर्ण दक्षिण गोव्यातील रुग्णांसाठी उभारण्यात आले आहे.

अनेकदा रुग्णसंख्या अचानक वाढल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात अडचणी निर्माण होतात. अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध असूनही जिल्हा रुग्णालयातच उपचार घेण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे केवळ विधानसभेत चर्चा करून चालणार नाही, तर संबंधित कामांचा सातत्याने पाठपुरावा करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फातोर्डा मतदारसंघातील एकही विकासकामाची फाईल अडवलेली नसल्याचा दावाही दामू नाईक यांनी केला. जर फाईल अडवली असती, तर मतदारसंघात विकासकामे झालीच नसती, असे ते म्हणाले. विजय सरदेसाई स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सरकार आणि इतरांवर आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT