दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात रविवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसानंतर वास्को येथील सडा-हार्बर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान अचानक दरड कोसळल्याने एका परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मजूर जखमी झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, क्रूझ सेंटर आणि पर्यटन क्षेत्राला जोडण्यासाठी सडा-हार्बर रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि डोंगर कापून संरक्षक भिंत बांधण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.
रविवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे माती मऊ झाली होती. सोमवारी संरक्षक भिंतीच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असतानाच दुपारी १२.४० वाजता अचानक वरून मातीचा ढिगारा मजुरांवर कोसळला. दरड कोसळली तेव्हा घटनास्थळावर एकूण चार मजूर काम करत होते.
माती कोसळताना पाहून इतर तीन मजुरांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने मनोरंजन मिंग याचा मातीच्या ढिगाऱ्याखाली चिरडल्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वास्को अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवून मातीच्या ढिगाऱ्याखालून मनोरंजन यांचा मृतदेह बाहेर काढला.
ढिगाऱ्यातून सुटका केलेल्या अन्य दोन मजुरांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार विरिएतो फर्नांडिस, पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, आमदार संकल्प आमोणकर, जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दरडग्रस्त भागाची पाहणी केली. खासदार कॅ. फर्नांडिस म्हणाले, हे संपूर्ण काम बेकायदेशीररीत्या होत आहे. शेकडो झाडांची कत्तल करून रस्ता रुंदीकरण व संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू केले आहे.
डोंगराळ भाग अशा पद्धतीने कापला आहे की, येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भूस्सखलन होणार आहे. याला पूर्ण जबाबदार भ्रष्ट नेते व काम करणारे संबंधित विभागाचे अधिकारी असल्याचे ते म्हणाले. हे बांधकाम योग्यरीत्या होत नसल्याची माहिती मी अधिकाऱ्यांना दिली होती. रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंत उभारताना डोंगराळ भाग आडवा न कापता उभाच कापला होता. संभाव्य धोका अधिकाऱ्यांच्या नजरेससुद्धा आणले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे एका कामगाराचा जीव गेल्याचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले.