पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव बंदरातील कोळसा आसपासच्या हाताळणीमुळे वस्तीमध्ये कोळसा प्रदूषणाच्या उग्र वासामुळे लोकांना जीवन जगणे असह्य बनले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी वास्कोतील कोळसाविरोधी ग्रामस्थांतर्फे नितीन चोपडेकर यांनी केली आहे.
पणजीत आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चोपडेकर म्हणाले की, मुरगाव बंदरामध्ये कोळसा हाताळणीच्या ठिकाणी डोम उभारला असला तरी अदानी कंपनीचा कोळसा हाताळणी उघड्यावर सुरू आहे.
या कोळसा प्रदूषणमध्ये सल्फर, नायट्रोजन व मर्क्युरी याचा समावेश असल्याने हृदयविकार, क्षयरोग (टीबी) व मेंदूवर परिणाम होणाऱ्या आजारामुळे त्या भागातील अनेकजण त्रस्त आहेत. वृद्ध व मुलांवर या प्रदूषणाचा मोठा परिणाम होत आहे. या प्रदूषणामुळे सागरी जीव धोक्यात आहेत. कोळसा हाताळणी पूर्णपणे कोलमडली असून कोणीही त्याविरुद्ध कारवाई करत नाहीत.
वायणा, सडा तसेच आजूबाजूच्या वस्तीला त्याचा मोठा फटका बसत आहे असे ते म्हणाले. या कोळसा प्रक्षणाविरोधा स्थानिक आमदार संकल्प आमोणकर हे तेथील जनतेबरोबर आहेत असा दिखाऊपणा दाखवत आहेत.
कोळशाला त्यांचा विरोध नाही तर होत असलेल्या प्रदूषणाला विरोध आहे. मुरगाव बंदरात अनेक गोमंतकिय कामाला आहेत. मात्र या कोळसा हाताळणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या परिणामाची त्यांना चिंता नाही.
आमदार नसताना संकल्प आमोणकर हे तेव्हा कोळसा हाताळणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात होते मात्र आमदार होऊन भाजपवासी झाल्यावर त्यांनी घुमजाव केले आहे. तो सत्तेत असताना लोकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहे हा फक्त दिखाऊपणा आहे व लोकांची दिशाभूल केली जात आहे.
या कोळसा प्रदूषण परिसरात राहणारे सर्वेश होबळे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून या प्रदूषणाचा त्रास तेथील लोक सोसत आले आहेत. या कोळसा हाताळणीवेळी होणाऱ्या हवेतील प्रदूषणामध्ये विषारी धातूचे कण लोकांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहेत. या भागात पाणीटंचाई असून अधिक तर पाणीपुरवठा या कोळशाच्या ठिकाणी पाण्याची फरवारणी करण्यास पुरवठा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोमंतकीयांना काहीच फायदा नाही: पोळजी
या कोळसा हाताळणीचे धूळ प्रदूषण वेळसाव व माजोर्डा या भागातही पोहचले आहेत व दोनापावलच्या दिशेने येत आहे. या कोळशाचा गोमंतकीयांना काहीच फायदा नाही. तो कर्नाटकमध्ये पाठवण्यासाठी गोव्यात दुहेरी रेल्मार्ग करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुरगाव बंदरापर्यंत दुहेरी मार्ग होऊ देणार नाही, असे ठाम आश्वासन दिले होते.
मात्र त्यांचेच शिष्य असललेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मात्र परस्परविरोधी भूमिका घेत असल्याची टीका शंकर पोळजी यांनी केली. मुरगाव बंदरात गोमंतकीयांना रोजगार मिळाला असल्याचे सांगून आमदार लोकांची दिशाभूल करत आहेत व स्वतःचे बॅगेज वाढवून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.