वास्को : पुढारी वृत्तसेवा
आपल्या नकळत आपल्या ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमधील जीपे अॅपचा वापर करून गेल्या साडेपाच महिन्यांत २ लाख ४० हजार रुपयांची रक्कम काढून फसवणुक केल्याची तक्रार विद्यानगर दाबोळी येथील विनायन यांनी वास्को पोलिस स्थानकात केली आहे.
वास्को पोलिसांनी याप्रकरणी चालक शंकर बाबू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायन यांच्याकडे शंकर बाबू हा चालक म्हणून काम करतो. तो त्यांच्या घरामध्येच राहतो.
शंकर याने विनायन यांच्या मोबाईल फोनमधील जीपे अॅपची अप्रामाणिक हेतूने माहिती मिळविली. त्यानंतर त्याने त्या माहितीचा वापर करून विनायन यांच्या नकळत त्यांच्या बँक खात्याशी जोडलेल्या जीपे ॲपद्वारा पैसे काढण्यास आरंभ केला. सदर प्रकार ३० मे २०२५ पासून आजतागत चालू होता.
शंकर याने सदर रक्कम त्याचा मित्र संकेत याच्या नावावर असलेल्या दुसऱ्या बँकेतील खात्यावर वळती केली होती. त्यानंतर ती रक्कम त्याचा दुसरा मित्र मिठू कुमार याच्या बँक खात्यामध्ये पाठविली.
सदर प्रकरण कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी शंकरने खबरदारी घेतली होती. तथापी सदर प्रकार उघडकीस आल्यावर विनायन यांनी पोलिस स्थानकात तक्रार केली. वास्को पोलिसांनी भारतीय न्यास संहिता २०२३ च्या ३१८, ३१६ (४) कलमाखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (क) कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.