Municipal Election Pudhari
गोवा

Vasco Constituency Election | दाजी साळकर यांच्यासमोर आव्हान कोणाचे?

Vasco Constituency Election | वास्को मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदार होण्याची किमया साधणार का; उत्सुकता शिगेला

पुढारी वृत्तसेवा

वास्को : पुढारी वृत्तसेवा

वास्को मतदारसंघाची १९८९ साली निर्मिती झाल्यापासून या मतदार संघातून भाजपचे कार्ल्स आल्मेदा वगळता इतर कोणीही सलगपणे दुसऱ्यांदा विजयी झालेले नाही. सायमन डिसोझा सलग दोनवेळा पण वेगवेगळ्या मतदारसंघांतून विजयी झाले होते. वास्को मतदार मतदारसंघाची १९८९ साली निर्मिती झाल्यावर सायमन डिसोझा हे वास्को मतदारसंघातून, तर १९८४ साली दाबोळी मतदारसंघातून विजयी झाले होते.

त्यामुळे विद्यमान आमदार कृष्णा (दाजी) साळकर हे २०२७ च्या निवडणुकीत विजय मिळवून सलगपणे दोनवेळा विजयी होण्याच्या कार्ल्स आल्मेदा यांच्या विक्रमाची बरोबरी करणार का, हा प्रश्न विचारला जात आहे. या घडीला तरी साळकर यांच्यासमोर काँग्रसेचे नेते व माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत वगळता इतर कोणाचेही आव्हान नाही. या मतदार संघातून जुझे फिलिप डिसोझा हे दोन वेळा विजयी झाले होते.

१९९९ मध्ये डिसोझा हे युगोडेपाच्या तिकिटावर तर २००७ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर जिंकले होते. दोन्हीवेळा त्यांची लढत भाजपचे तत्कालीन उमेदवार राजेंद्र आर्लेकर यांच्याशी झाली होती. २०२२ मध्ये जुझे फिलिप डिसोझा यांनी वास्को मतदार संघाऐवजी दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांची छाप पडली नाही. त्यामुळे २०२७ ची निवडणुकीत ते वास्को मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस पक्षाने इतर राजकीय पक्षांकडे युती केल्यास जुझे फिलिप डिसोझा हे वास्को मतदारसंघावर आपला दावा सांगतील, असे बोलले जात आहे. वास्को मतदार संघात काँग्रेसची एकगठ्ठा मते आहेत.

काँग्रेसने आमदार साळकर यांच्या तोडीसतोड उमेदवार दिल्यास तसेच काँग्रेसची युती झाल्यास वास्को मतदार संघात अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मध्यंतरी माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी आपण वास्को मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची हवा तयार केली होती. परंतु, ते आता साळकर यांच्यासमवेत विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे. साळकर हे सातत्याने आपल्या मतदारांशी संपर्क साधून आहेत. प्रत्येक प्रभागात त्यांनी विकासकामे हाती घेतली आहेत.

आपली कामे अदृश्य नव्हेत तर प्रत्यक्षात लोकांना दिसत असल्याचा दावा ते नेहमी करतात. गेल्या ३०-४० वर्षांत जो विकास झाला नंदादीप राऊत नाही, तो विकास आपण केल्याचा दावा साळकर करतात. या दाव्याला त्यांच्या समर्थकांचे मोठे पाठबळ मिळत आहे. तर नंदादीप राऊत यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात येथील मासळी मार्केट व मुरगाव पालिका प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणासाठी लागणारा निधी जीसुडाच्या खात्यात वळता केला होता.

अर्थात त्यावेळी त्यांना तत्कालीन आमदार आल्मेदा यांची साथ होती. गेल्या निवडणुकीत राऊत यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु ऐनवेळी ती उमेदवारी आल्मेदा यांना देण्यात आल्यावर राऊत पुन्हा भाजपाच्या बाजूने झाले होते. त्यानंतर घडलेल्या काही घडामोडीनंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले. यावेळेस आपणास काँग्रेसची उमेदवारी मिळणारच, असे ते सांगतात. त्यांनी मतदारांशी संवाद, संपर्क साधण्यास आरंभ केला आहे.

एखाद्या समस्येवर, घटनेवर ते आवाज उठविताना, आमदार साळकर, भाजपा सरकार यांना लक्ष्य करीत आहेत. या मतदार संघातून १९८९ साली काँग्रेसचे सायमन डिसोझा हे मगोचे डॉ. विल्फेड मिस्किता यांचा ३२५ मतांनी पराभव करून विजयी झाले होते. या निवडणुकीत जुझे फिलिप डिसोजा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. १९९४ च्या निवडणुकीत डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी पराभवाची परतफेड करताना काँग्रेसचे सायमन डिसोझा यांचा दीड हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता.

या निवडणुकीत जुझे फिलिप डिसोझा यांनी साडेचार हजारपेक्षा अधिक मते मिळविली होती. १९९९ च्या निवडणुकीत युगोडेपाचे जुझे फिलिप डिसोझा हे सुमारे दीड हजार मतांनी भाजपाचे राजेंद्र आर्लेकर यांच्यावर मात करून विजयी झाले होते. या निवडणुकीत मगो ऐवजी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणारे डॉ. विल्फ्रेड मिस्किता, डॉ. श्रीकांत वेरेकर, अपक्ष उमेदवार व माजी आमदार सायमन डिसोझा उभे होते.

२००२ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेद्र आर्लेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी आमदार जुझे फिलिप डिसोझा यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसचे करोल ताहीर दाऊद, मगोचे डॉ. श्रीकांत वैरेकर, अपक्ष उमेदवार तारा केरकर, सीपीएमचे थाल्मन परेरा उभे होते. २००७ सालच्या निवडणुकीत जुझे फिलिप डिसोझा यांनी भाजपचे राजेंद्र आर्लेकर यांचा पराभव केला.

या निवडणुकीत जेडी (एस) तर्फे कार्ल्स आल्मेदा, युगोडेपातर्फे आर्नाल्डो रेगो, मगोतर्फे सेहुलो बारॉस, सेव्ह गोवा फ्रंटतर्फे मिल्टन बार्रेटो उभे होते. २०१२ च्या निवडणुकीत भाजापचे कार्ल्स आल्मेदा यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे उमेदवार जुझे फिलिप डिसोझा यांच्यावर सुमारे साडेचार हजार मतांनी विजय मिळविला होता. यावेळेस माजी आमदार काल्ल वाझ यांनी मुरगावऐवजी वास्को मतदान संघातून निवडणूक लढविली होती त्यांना फक्त १३९४ मतांवर समाधान मानावे लागले.

आल्मेदांचा प्रवेश; साळकर बिनधास्त

आल्मेदा यांनी अलीकडे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपल्या समर्थक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याने साळकर हे बिनधास्त आहेत. साळकर यांच्यासमोर कोणाचेही आव्हान नसल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. साळकर यांनी विकासकामे करून वास्कोचा कायापालट केला आहे. त्यामुळे वास्कोतील मतदार हे साळकर यांच्यामागे उभे राहतील, यात शंकाच नसल्याचे त्यांचे समर्थक म्हणतात. एक मात्र खरे साळकर व त्यांच्या समर्थकांनी वास्को कदंब बसस्थानकावरून मोठा आवाज केला होता. आपण आमदार झाल्यास कदंब बसस्थानक पूर्णत्वाला नेण्याचे आश्वासन साळकर यांनी दिले होते.

२०१७ मधील घडामोड; साळकरांची बाजी

२०१७ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार कृष्णा साळकर यांनी भाजपचे कार्ल्स आल्मेदा यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. ते आव्हान मोडून आल्मेदा सलगपणे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जुझे फिलिप डिसोझा, काँग्रेसचे सैफुल्ला खान, आपच्या लॉरेटा डिसोझा, मगोचे मनेश आरोलकर उभे होते. २०२२ मध्ये कार्ल्स आल्मेदा यांना भाजपने तिकीट नाकारून कृष्णा साळकर यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे आल्मेदा यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली. ऐनवेळी उमेदवारी दाखल करून त्यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले होते. तथापि साळकर यांनी बाजी मारली.

काँग्रेसतर्फे सध्या तरी राऊत यांचीच चर्चा

कदंब बसस्थानकाच्या रस्त्याचे डांबरीकरण वगळता गेली ५ वर्षे बसस्थानक जैसे थे आहे. याउलट आता तेथे पीपीपी धर्तीवर बसस्थानक बांधताना पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याविरोधात नंदादीप राऊत यांनी आवाज उठविला आहे. या पीपीपी मॉडेलसंबंधी वास्कोवासीयांना योग्य स्पष्टीकरण देण्याची गरज राऊत यांनी व्यक्त केली आहे. राऊत यांनी आपले संपर्क कार्यालय सुरू करून मतदारांशी संवाद, संपर्क साधण्यास आरंभ केला आहे. सध्या तरी काँग्रेसतर्फे राऊत यांचे नाव घेतले जात आहे. या नावात आणखी कोणाची भर पडते काय, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT