वास्को : पुढारी वृत्तसेवा
कुठ्ठाळीत काँग्रेस गटाच्या बैठकीत हमरीतुमरी झाली. वादाचे पर्यावसन भांडणात झाले व नंतर मारहाणीपर्यंत पोचले. त्यामुळे पोलिसांनाही पाचारण करावे लागले. यासंदर्भात वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने सध्या त्याची चर्चा सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सिमोईस यानी झुआरीनगर येथे कार्यालयात मंगळवारी (ता. ३०) बैठक बोलाविली होती. त्यावेळी त्या बैठकीला काही नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीला पीटर यांना आमंत्रण दिले नव्हते. तथापी काहीजणांनी पीटर यांना माहिती दिल्यावर ते बैठकीच्या ठिकाणी आले. आपण गटाध्यक्ष असतानाही आपणास का आमंत्रण नाही, तुम्हाला शिष्टाचार माहित नाही काय अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर वाद वाढत गेला. त्यातून ही हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.