दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
नाताळ सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वास्को बाजारपेठ नाताळाच्या विविध साहित्याने सजली आहे. व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचे आकर्षक साहित्य बाजारात विक्रीसाठी आणले असून ग्राहकांनी खरेदीसाठी पसंती दर्शविली आहे. विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी आणि रंगरंगोटीसाठीची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी सजावटीच्या साहित्यात ८ ते १० टक्क्यांची वाढ झाली असली तरी खरेदीसाठीचा उत्साह कायम आहे.
नाताळासाठी लागणारे साहित्य बाजारात दाखल झाले आहे. सजावटीचे सामान, विद्युत रोषणाईच्या माळा, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचेमुखवटे, स्नोबॉल, टोप्या, तयार गोठे आणि रंगीबेरंगी नक्षत्रे, चांदण्या, गोठ्यात ठेवण्यासाठी लागणाऱ्या मूर्ती आदी सामान दाखल झाले आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सजावटीच्या साहित्याच्या दरांमध्ये ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वास्को बाजारात मोठ्या प्रमाणात सजावट साहित्य, फटाके खरेदीची दुकाने बाजार परिसरात थाटण्यात आली आहेत. विविध दराची नक्षत्रे, गोठे, व इतर साहित्य येथून नागरिक आवर्जून खरेदी करून घेऊन जात आहेत.
बाजारात उपलब्ध असलेल्या ख्रिसमस ट्रीच्या दरांमध्येही विविधता पाहायला मिळत आहे लहान कृत्रिम ख्रिसमस ट्री ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असून, मध्यम आकाराचे ट्री १ हजार ५०० ते ३ हजार रुपये दरम्यान विकले जात आहेत मोठ्या व अधिक सजावटीच्या ट्रींचे दर ४ हजार रुपयांपासून ७ हजार रुपयांपर्यंत आहेत.
विद्युत रोषणाई करणाऱ्या माळांचे दर २०० ते १ हजार २०० रुपयांपर्यंत असून, नक्षत्रे व ताऱ्यांचे दर १०० ते ५०० रुपये आहेत. सांताक्लॉजचे कपडे ८०० ते २ हजार ५०० रुपये, तर टोप्या १०० ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत पारंपरिक गोठ्यासाठी लागणाऱ्या मातीच्या बाहुल्यांचे संच ५०० ते २ हजार रुपये दरात मिळत असून, सजावटीचे लहान साहित्य व शोभेच्या वस्तू ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत.