पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारताला स्वातंत्र्य मिळाले असले, तरी देशाला खऱ्या अर्थान स्वातंत्र्याची प्रेरणा बंकिमचंद्र चटर्जी या यांच्या वंदे मातरम् देशभक्तीगीतामुळेच मिळाली. राष्ट्रप्रेम जागृत करणारे हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिल्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवचैतन्य लाभले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. काही काळ या गीताकडे दुर्लक्ष झाले होते; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत १५० वर्षांचा गौरव करत देशवासीयांच्या त्यागाची आणि राष्ट्रभक्तीची पुन्हा एकदा आठवण करून दिली, असे सावंत म्हणाले.
काही राजकीय नेते या विषयावर केवळ राजकारण करत असून, असा दृष्टिकोन राष्ट्राच्या एकतेस धक्का देणारा ठरू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. देशाची अखंडता अबाधित राहण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी अपार त्याग केला. डॉ. केशव बळीराम हेगडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक थोर नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भारतीय तिरंगा ध्वज हे राष्ट्राचे प्रतीक असून त्याचा आम्हाला सर्वोच्च आदर आहे. त्याचबरोबर भगव्या ध्वजाचाही आम्हाला अभिमान असून देशाच्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'विकसित भारत २०४७' हे ध्येय साध्य करताना वंदे मातरम गीतातील आशय आणि मूल्यांनुसारच विकासाची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने कधीही सामान्य जनतेच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेले नाही. विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान बहुतांश आमदारांनी वंदे मातरम् गीत शाळा व महाविद्यामध्ये सक्तीने गायले जावे अशी मागणी केली असल्याचे ते म्हणाले.