पणजी : पुढारी वृत्तसेवा
वंदे मातरम् हे गीत आजही ऊर्जा देणारे असले तरी भारतीय घटनेत देशातील गरीब, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना समानतेचा अधिकार देते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विधानसभेत झालेल्या चर्चेत बोलताना आलेमाव म्हणाले की, या सभागृहातील सदस्यांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवली पाहिजे.
सरकारने विरोधी आमदारांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. राज्यात बेसुमार महागाई वाढली असून शेतीच्या संरक्षणासाठी कायदे केले जात असले, तरी शेतजमिनींचे रुपांतरण कसे केले जाते, हा गंभीर प्रश्न आहे. वंदे मातरम् हे गीत एकेकाळी देशहितासाठीची चळवळ होती व ती देश स्वातंत्र्याच्या लढ्यात ते देशभक्तगीत बनले.
त्याच गीताच्या प्रेरणेतून गोव्यात सुरक्षा, जमिनींचे संरक्षण आणि हक्कांसाठी नव्याने लोकांची चळवळ उभी राहण्याची गरज निर्माण झाली आहे. वंदे करत मातरम्चा जयघोष स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढताना प्राणांची आहुती दिली. आजची परिस्थितीही त्याकाळापेक्षा फार वेगळी राहिलेली नाही. त्यामुळे सरकारने जनहिताच्या प्रश्नांकडे लक्ष देत वंदे मातरम्चा आदर करावा, असेही आलेमाव म्हणाले.