वाळपई (पुढारी वृत्तसेवा):
वास्को येथे एकाच रात्रीत लागलेल्या भीषण आगीत अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या घटनेमुळे राज्यातील बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि सार्वजनिक इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या यंत्रणेकडून विविध मार्गांमध्ये अग्निसुरक्षेच्या उपायांची तपासणी आणि सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
याच मोहिमेंतर्गत वाळपई नगरपालिका क्षेत्रात नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत तीन महत्त्वाच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
वाळपई नगरपालिकेची मुख्य कार्यालयीन इमारत, शहरातील नवीन मार्केट आणि नगरपालिकेची जुनी कार्यालयीन इमारत या तीन ठिकाणी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्या.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी अग्निशमानासाठी बसवण्यात आलेली हायड्रंट यंत्रणा कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याही इमारतीत अचानक आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, व्यापारी आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अग्निशमन दलाच्या पाहणी पथकाने या संदर्भात वाळपई नगरपालिका आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. हायड्रंट यंत्रणा दुरुस्त करून कार्यन्वित करणे, पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करणे आणि अग्निसुरक्षेच्या इतर त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही अग्निशामक दलाच्या यंत्रणेकडून देण्यात आले आहे. वाळपई शहरातील जुन्या मार्केटची इमारत पाहून त्या ठिकाणी नवीन मार्केट उभारण्यात आले आहे. या नवीन मार्केटमध्ये अनेक व्यापारी आपले व्यवसाय करीत आहेत. दिवसभर ग्राहक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, अग्निशमन दलाच्या पाहणीदरम्यान या मार्केटमध्ये बसवण्यात आलेली हायड्रंट यंत्रणा अकार्यक्षम असल्याचे आढळून आले.
व्यापारी संकुलात एकाच वेळी अनेक दुकाने सुरू असतात, विविध प्रकारचे साहित्य, विद्युत उपकरणे आणि ज्वलनशील वस्तूंचा वापरही काही दुकानांमध्ये केला जातो. त्यामुळे एखाद्या दुकानात आग लागल्यास ती शेजारील दुकानांपर्यंत पसरण्याचा धोका असतो. अशा वेळी हायड्रंटसारखी अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर नवीन मार्केटमधील अग्निसुरक्षेच्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश अग्निशमन दलाच्या अधिकारकांनी दिले आहेत. दरम्यान, वाळपई नगरपालिका क्षेत्रातील तीन महत्त्वाच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने असुरक्षितता असल्याचे समोर आल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी
वाळपई नगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या पाहणी मोहिमेत अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर, उपसंचालक आळदकर, वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस, तसेच वाळपई नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र आर्लेकर, मार्केट निरीक्षक आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. या पथकाने विविध इमारतीमधील अग्निसुरक्षेच्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध यंत्रणेची तपासून घेतली. यावेळी हायड्रंट व्यवस्था, पाण्याची उपलब्धता आणि आग लागल्यास ताраडीने करता येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
हायड्रंट अनेक वर्षांपासून बंद
अग्निशमन दलाच्या पथकाने सर्वप्रथम वाळपई नगरपालिका मुख्य कार्यालयीन इमारतीची पाहणी केली. या इमारतीमध्ये अग्निशमानासाठी हायड्रंटची व्यवस्था केलेली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या यंत्रणेची योग्य प्रकारे हाताळणी आणि देखभाल न झाल्यामुळे ती प्रत्यक्षात नसल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले. त्यामुळे आवश्यक दुरुस्ती करून हायड्रंट पुन्हा कार्यन्वित करणे अत्यंत गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.