पणजी पत्रकार परिषदेत बोलताना वाल्मीक नाईक. सोबत अन्य पदाधिकारी. pudhari photo
गोवा

Goa Political News : ज्ञानेश कुमारांवर कारवाईची 'आप'ची मागणी

कार्यकाळातील निवडणुका रद्द करून फेरनिवडणुकीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या राज्यांतील निवडणुका रद्द करून फेरनिवडणुका घ्याव्यात, अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मीक नाईक यांनी केली आहे.

पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी मानुएल कार्दोज, संदीप पेडणेकर आणि गीतेश नाईक उपस्थित होते. नाईक यांनी आरोप केला की, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार एकतर्फी निर्णय घेत असल्याची तक्रार त्यांच्या सहकारी दोन निवडणूक आयुक्तांनी १४ वेळा लेखी स्वरूपात केली होती. आयोगाचे निर्णय आपल्याला वृत्तपत्रांतील बातम्यांमधून समजत असल्याचेही त्यांनी नमूद केल्याचा दावा नाईक यांनी केला.

गोव्यात ९७ मतदार पात्र असूनही त्यांना मतदार हक्कापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप नाईक यांनी केला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आठ वेळा प्रयत्न केले; मात्र सॉफ्टवेअरचे कारण देऊन ते नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नव्या मतदारांना नोंदणीपासून वंचित ठेवण्यासाठी मतदार नोंदणी अर्जात फेरफार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

फोंड्यात ५,३६० मतदारांची नावे वगळल्याचा दावा

फोंडा पोटनिवडणुकीतील आपचे उमेदवार गीतेश नाईक यांनी दावा केला की, नव्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणामुळे फोंडा विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३६,८०० मतदारांपैकी ५,३६० नावे वगळण्यात आली आहेत. पोटनिवडणुकीच्या वेळी सुमारे अडीच हजार मतदार नावे वगळल्याची तक्रार घेऊन आले होते, असे त्यांनी सांगितले. भाडेकरू म्हणून राहणाऱ्या काही व्यक्तींनाही मतदार म्हणून नोंदणी करता आली नसल्याचा दावाही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT