उतोर्डा येथील ‘जॅमिंग गोट’ शॅकला पहाटे भीषण आग लागली.
वेर्णा व मडगाव अग्निशमन दलाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
आगीत सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले.
शॉर्टसर्किटचा संशय; मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.
मडगाव : पुढारी वृत्तसेवा
उतोर्डा येथील 'जॅमिंग गोट' या शंकला रविवारी पहाटे भीषण आग लागली. वेर्णा आणि मडगाव अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत रॉकमधील साहित्याचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यातच जिल्हा प्रशासनाने या शंकचे बेकायदा बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले होते. स्नेहा नरोन्हा यांच्या मालकीच्या या शंकला रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास आग लागली.
घटनेची माहिती मिळताच वेर्णा अग्निशमन दलाचे अधिकारी दिलेश गावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची व्याप्ती वाढल्याने मडगाव अग्निशमन दलाचा बंबही पाचारण करण्यात आला. या आगीत शॅकमधील टेबल, खुर्चा, विद्युत वायरिंग आणि मद्याच्या साठ्यासह इतर साहित्य जळून खाक झाले.
रॉकमध्ये गॅस सिलिंडरही होते. परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अग्निशमनचा परवाना नव्हता...
अग्निशमन दलाने केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शॅकच्या बांधकामासाठी अग्निशमन दलाचा कोणताही परवाना घेण्यात आला नव्हता, तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. दरम्यान, गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने केलेल्या पाहणीत या शॅकचे बांधकाम बेकायदा आढळले होते. त्यानुषंगाने दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिले असून, सोमवारी सकाळी हे बेकायदा बांधकाम पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.