

पणजी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायत निवडणूक ही २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल समजली जाते. त्यामुळे या जि.पं. निवडणुकीला महत्व आहे. दोन्ही जिल्हा पंचायतीवर बहुमत मिळवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी केला आहे. मतदारांनी दिलेल्या कौलातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे गणित ठरणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्य प्रमुख अॅड. अमित पालेकर यांचा विधामनसभा मतदारसंघ असलेल्या सांताक्रुझमध्ये येणाऱ्या सांताक्रुझ व चिंबल या दोन मतदारसंघात आपचे उमेदवार निवडून आले तर अॅड. पालेकर यांचा विधानसभा प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे. आरजी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब हे थिवी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी शिरसई व कोळवाळ या दोन जिल्हा पंचायत मतदारसंघात विजय महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची ही पहिली निवडणूक असल्याने दोन्ही जि.पं. वर बहुमत असलेल्या भाजपला ते टिकवून ठेवायचे आहे. कारण त्यावर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची मदार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी २०२२ मध्ये निवडणूक लढवलेल्या कुडचडे विधानसभा मतदारसंघातील शेल्डे मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाला तर आगामी निवडणूक लढणे सोपे जाणार आहे.