Goa Drone Technology 
गोवा

Goa Drone Technology | ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग संशोधन आणि उद्योजकतेसाठी करा; संचालक भूषण सावईकर यांचे आवाहन

Goa Drone Technology | भूषण सावईकर : बोर्डा येथील सीएमएसआरमध्ये ड्रोन प्रशिक्षण शिबीर उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
ड्रोन तंत्रज्ञानाला भविष्यत मोठे महत्त्व प्राप्त होणार असून, विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग शैक्षणिक प्रकल्प, संशोधन आणि उद्योजकतेसाठी करावा, असे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी केले.

गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद आणि उच्च शिक्षण संचालनालय, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सी-डॅक, बेंगळुरु यांच्या सहकार्याने बोर्डा-मडगाव येथील शासकीय बहुविद्याशाखीय अध्ययन व संशोधन महाविद्यालयात पाच दिवसीय ड्रोन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सावईकर बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एफ. एम. नदाफ, सी-डॅक, बेंगळुरुचे वरिष्ठ डिझाइन अभियंता हरीश चंद्र आणि प्रशिक्षण शिबिराच्या समन्वयक डॉ. कविता असनानी आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देणे आवश्यक आहे, असे सावईकर यांनी नमूद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एफ. एम. नदाफ यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. ड्रोन आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या (जीआयएस) साहाय्याने नक्शे तयार करणे, जमिनीचे सर्वेक्षण करणे, वाहतूक व्यवस्थापन आणि मालवितरण अशा विविध क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण शिबिराच्या समन्वयक डॉ. कविता असनानी यांनी शिबिराच्या उद्दिष्टांची माहिती दिली. ड्रोन तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांपासून ते त्याच्या प्रत्यक्ष वापरपर्यंत तसेच विविध अनुप्रयोग विकसित करण्यापर्यंतचे मार्गदर्शन या प्रशिक्षणामध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील ६७ विद्यार्थ्यांचा सहभाग

या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात गोव्यातील विविध तांत्रिक आणि उच्च शिक्षण संस्थांमधील ६७ विद्यार्थींनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना ड्रोनची रचना, त्यातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सेन्सर्स, नियंत्रक, ड्रोन उड्डाणाची कार्यपद्धती आणि ड्रोन वापरसंबंधीच्या नियमांची माहिती देण्यात आली. याशिवाय, ड्रोनचे विविध भाग जोडणे, त्यांची चाचणी घेणे, प्रोग्रामिंग करणे आणि प्रत्यक्ष ड्रोन उडविणे यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचे सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक अनुभव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT