वाळपई : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्याच्या अनेक भागांमध्ये शुक्रवारी सायंकाळी अचानकपणे पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. अशा परिस्थितीत अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, सुपारी उत्पादकांना बसला असून वाळत घातलेली सुपारी भिजल्याने उत्पादकांचे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून सत्तरी तालुक्यात उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. संध्याकाळच्या सुमारास काही प्रमाणात वारा वाहत असल्यामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण होत होता. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी अचानक हवामानात बदल होऊन पावसाने हजेरी लावली.
सायंकाळी सुमारे ५ च्या दरम्यान अचानक आकाशात ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह गडगडाट सुरू झाला. त्यानंतर वादळी वाऱ्याचा जोर वाढला आणि पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पावसाची सर सुरू होती. तालुक्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याची माहिती मिळाली आहे.
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत तसेच रस्त्यांवर असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. काही नागरिकांनी दुकानांच्या आडोशाला, तर काहींनी झाडांचा आधार घेत पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे दैनंदिन कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी धावपळ झाली.
सध्या सत्तरी तालुक्यात सुपारी काढणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक बागायतदारांनी सुपारी हार्वेस्टिंगचे काम पूर्ण केले असून काढलेली सुपारी वाळविण्यासाठी मोकळ्या जागेत तसेच अंगणात पसरून ठेवली आहे. सुपारी व्यवस्थित वाळविण्यासाठी सलग काही दिवस ऊन मिळणे आवश्यक असते. त्यानंतरच सुपारीची पुढील प्रक्रिया करता येते. विशेष म्हणजे, सुपारी हा सत्तरी तालुक्यातील अनेक बागायतदारांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. सुपारी काढणी, सोलणे, वाळविणे आणि विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागते. अशावेळी अचानक आलेल्या पावसामुळे तयार केलेल्या मालाचे नुकसान होण्याची भीती उत्पादकांना सतावत आहे.
हवामानातील बदलामुळे बागायतदार चिंतेत
सध्या तालुक्यातील अनेक भागांमध्ये बागायती उत्पादनांची काढणी आणि प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे हवामानातील अचानक होणारे बदल बागायतदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. विशेषतः सुपारी वाळविण्याच्या काळात पावसाची अनपेक्षित हजेरी लागल्यास उत्पादकांना माल सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते.
एकीकडे वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे सुपारी उत्पादकांना त्याचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे आगामी काळात हवामानातील बदल लक्षात घेऊन बागायतदारांनी काढणी केलेल्या सुपारीची योग्य काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. सत्तरी तालुक्यातील नागरिकांसाठी हा पाऊस उष्णतेपासून दिलासा देणारा ठरला असला, तरी सुपारी उत्पादकांसाठी मात्र अचानक आलेल्या पावसाने चिंता वाढवली आहे.