सांगे : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी समाजाची परंपरा, कला, क्रीडा आणि जीवनशैली ही गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. या संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कला व संस्कृती खात्याचे मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी केले.
सांगे आदिवासी क्रीडा व सांस्कृतिक क्लब, सांगे यांच्या वतीने श्री चौरसमाया युवा क्रीडा व सांस्कृतिक क्लब, ओल्ड वाडे, तसेच जल्मी महामाया क्रीडा व सांस्कृतिक क्लब, नंदे यांच्या सहकार्याने आणि कला व संस्कृती संचालनालय यांच्या पाठबळाने आयोजित करण्यात आलेल्या 'आदिवासी महोत्सव २०२६' चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
हा तीन दिवसीय महोत्सव २४ ते २६ जानेवारी दरम्यान पीएम श्री शासकीय माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर, वाडे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत सदस्य राजश्री आदिवासी महोत्सव आयोजन समितीचे सुहास देवकर आदी उपस्थित होते.
गावकर, सरपंच दिव्या नाईक, राजेश गावकर, बुंडा वरक, चंदन हुंडनकर, चंद्रकांत गावकर, मंत्री तवडकर म्हणाले, आदिवासी समाजाने पिढ्यानपिढ्या जपलेली लोककला, लोकनृत्ये, पारंपरिक क्रीडा, संगीत आणि जीवनपद्धती ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. आदिवासी महोत्सवासारख्या उपक्रमांमुळे या समृद्ध वारशाला व्यासपीठ मिळते, नव्या पिढीमध्ये संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होतो आणि आदिवासी कलावंतांना ओळख मिळते.
ते पुढे म्हणाले की, सरकार केवळ विकासाच्या योजना राबवत नाही, तर सांस्कृतिक मुळांशी नाळ जपून समावेशक विकास साधण्यावर भर देत आहे. आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षण, क्रीडा, रोजगार आणि सांस्कृतिक क्षेत्रात सरकार सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा महोत्सवांमुळे आदिवासी युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.