नवी दिल्ली : वृत्तसंस्था पर्यटन क्षेत्राकडे रोजगारनिर्मिती आणि परकीय चलन मिळवण्यासाठी मोठी भूमिका बजावण्याची क्षमता असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करताना सांगितले. त्यादृष्टीने त्यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणपूरक, वैद्यकीय, पुरातत्त्व वारशाला चालना देणाऱ्या योजना जाहीर केल्या.
समुद्री कासवांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणी 'टर्टल ट्रेल्स' स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र, त्याची मुहूर्तमेढ करणाऱ्या देवगडचा त्यात समावेश नसल्याने कोकणवासीयांमध्ये निराशा व्यक्त होत आहे. तरतुदीनुसार, नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीचे उन्नतीकरण करून राष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी संस्था स्थापन करण्यात येणार आहे. ही संस्था शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि सरकार यांच्यातील सेतू म्हणून कार्य करेल.
यासोबतच देशभरातील प्रमुख पर्यटन केंद्रांमध्ये १०००० गाईडस्ना प्रशिक्षण योजना सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पर्यावरणपूरक पर्वत, कासव ट्रेल्स हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पर्यावरणपूरक पर्वत ट्रेल्स विकसित करण्यात येतील. याशिवाय पूर्व घाटातील अराकू व्हॅली आणि पश्चिम घाटातील पोथिगाई मलै येथेही असे ट्रेल्स उभारले जातील. ओडिशा, कर्नाटक आणि केरळमधील कासवांच्या प्रमुख अंडी घालण्याच्या ठिकाणी 'टर्टल ट्रेल्स' विकसित केल्या जाणार आहेत.
पुरातत्त्व स्थळांचे सांस्कृतिक पर्यटनात रूपांतर
देशातील १५ पुरातत्त्व स्थळांचे सजीव आणि अनुभवाधारित सांस्कृतिक पर्यटन केंद्रांमध्ये रूपांतर केले जाईल. उत्खनन केलेले परिसर विशेषरीत्या आखलेल्या पादचारी मार्गांद्वारे पर्यटकांसाठी खुले केले जातील.
आंतरराष्ट्रीय प्रवास स्वस्त
आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजवर आकारला जाणारा सध्याच्या ५ टक्के आणि २० टक्क्यांऐवजी थेट २ टक्के करण्यात आला. असून, यासाठी कोणतीही किमान रकमेची अट ठेवण्यात आलेली नाही. वैद्यकीय पर्यटनासाठी पाच केंद्रे खासगी क्षेत्राच्या भागीदारीत देशात पाच प्रादेशिक वैद्यकीय पर्यटन केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. येथे वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि संशोधन सुविधा एकत्रित असतील. या केंद्रांमध्ये आयुष केंद्रे, मेडिकल व्हॅल्यू टूरिझम सुलभता केंद्रे तसेच निदान, उपचारोत्तर काळजी आणि पुनर्वसनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीचे उन्नतीकरण करून नॅशनल इन्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी स्थापन केली जाणार.
ही संस्था शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणार.
देशभरातील पर्यटन केंद्रांमध्ये गाईडस् प्रशिक्षणासाठी पायलट योजना.
ईशान्येकडील राज्यांत बौद्ध यात्रेकरूंसाठी 'बुद्धिस्ट सर्किट' योजना
आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजवरील दर ५ टक्के आणि २० टक्केवरून थेट २ टक्के
बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश मध्ये ५ पर्यटन हब्स
परदेशी टूर पॅकेजवरील दोन टक्क्यांवर आणल्याने प्रवाशांवरील आर्थिक ताण कमी होईल. सांस्कृतिक आणि अनुभवाधारित पर्यटनावर दिलेला भर भारताच्या पर्यटनाचे स्वरूप बदलू शकतो.- करण अग्रवाल, संचालक, कॉक्स अँड किंग्स
परदेशी टूर पॅकेजवरील सुलभीकरणामुळे भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. पायाभूत सुविधा, प्रादेशिक संपर्क आणि कौशल्य विकासावर दिलेला भर पर्यटन अनुभव अधिक समृद्ध करेल.- राजेश मगो, अध्यक्ष, एफआयसीसीआय पर्यटन समिती