Goa 
गोवा

Goa TMC Political Status | तृणमूल, राष्ट्रवादी, शिवसेनेची अस्तित्वासाठी धडपड

Goa TMC Political Status | सक्रिय नसल्याने विधानसभा जिंकणे होणार कठीण; तृणमूलचे उमेदवार इतर पक्षांकडे

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे

पारवाडकर गोव्यात भाजप, काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी हे सक्रिय असलेले व विधानसभेत आमदार असलेले पक्ष आहेत; पण त्याचबरोबर २०२२ च्या निवडणुकीत २४ जागा लढवून ४७, ३९९ मते घेतलेली व चर्चिल आलेमाव, किरण कांदोळकर, बेंजामिन सिल्वा यासारख्या माजी आमदारांना उमेदवारी दिलेली तृणमूल काँग्रेस, ९ जागा लढवून ७०९६ मते घेतलेली राष्ट्रवादी व ५ मतदारसंघ लढवून ५६० मते घेतलेली शिवसेना हे पक्षही राज्यात आहेत. मात्र, त्यांची अस्तित्वासाठी धडपड चालू आहे.

यातील शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी एका निवडणुकीत ३ आमदार निवडून आणले होते व त्यातील दोन मंत्रीही होते. मात्र, सध्या हा पक्ष अस्तित्वहीन झालेला आहे. माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. २०२२ च्या निवडणुकीत या पक्षाने ९ जागा लढवल्या व ७०९६ मते मिळवली. डिसोझा यांना दाबोळीत १०३७ मते मिळाली व ते पाचव्या क्रमांकावर पोहचले.

या पक्षाचे नुवेचे उमेदवार मिकी पाशेको (१३०५) व वेळ्ळीचे उमेदवार फिलीप नेरी रॉड्रीग्ज (३४२०) या माजी मंत्र्यानी चांगली मते घेतली होती. मात्र, ते आता या पक्षासोबत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट राज्यात सक्रिय नसला तरी या पक्षाचे चैतन्य (सनी) मानकर हे युवा नेते डिचोलीत काम करत आहेत.

दुसरा पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस. या पक्षाने २०२२ मध्ये मगो पक्षासोबत युती केली व तब्बल २४ जागा लढवल्या व ४३,३९९२ मते घेतली. तेव्हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता असल्याने भरीव निधी गोव्यातील निवडणुकीसाठी खर्च केला होता. अनेक माजी आमदार व नेते या पक्षात दाखल झाले व उमेदवार बनले. त्यात माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव (बाणावली ५१४० मते), वालंका आलेमाव (नावेली ४७३८), कविता कांदोळकर (थिवी ७३६३), माजी आमदार किरण कांदोळकर (हळदोणे ३७४७) या उमेदवारांनी दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.

मात्र, सध्या हा पक्ष अस्तित्वहीन बनला आहे. वरील नेत्यांनी निवडणुकीनंतर या पक्षाची साथ सोडली आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता गेल्याने तृणमूल काँग्रेसचे गोव्यातील अस्तित्वही पणाला लागले आहे. या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो हे कधीतरी पत्रकार परिषद घेतात. मात्र, यावेळी या पक्षाला संधी फारच कमी दिसते. तिसरा पक्ष म्हणजे शिवसेना.

शिवसेनेच्या दोन्ही गटांपैकी उद्धव ठाकरे गटाची शिवसेना गोव्यात अनेक वर्षांपासून होती. आता ती सुस्त असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गोव्यात काम सुरू केले आहे. २०२२ च्या निवडणुकीत शिवसेनेने पाच जागा लढवल्या. मात्र, त्यांच्या उमेदवारांना ५६० मते मिळाली. शिंदे यांची शिवसेना अलीकडे गोव्यात सक्रिय झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केलेल्या शिवसेनेचे गुंतलेले आहेत. या पक्षाचे सुनील सांतिनेजकर हे एकनाथ शिंदे यांच्या राज्यप्रमुख जितेश कामत व्यवसायात शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत.

आताच पक्षबांधणी सुरू

अलीकडेच शिवसेनेने आपला स्थापना दिन पर्वरी येथे साजरा केला. त्यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थिती होते. शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख उपेंद्र गावकर हे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे राज्य प्रमुख आहेत. मात्र आत्ताच त्यांनी पक्षबांधणी सुरू केली आहे. या पक्षाने ३० जागा लढविण्याची घोषणा केली असली तरी ती घोषणाच ठरण्याची शक्यता असून राजकीय स्थिती पाहता वरील तिन्ही पक्षांना येत्या निवडणुकीत संधी फारच कमी दिसते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT