Tillari Dam 
गोवा

Tillari Dam | तिळारीचे पाणी 1 ऑक्टोबरपासून तीन महिने बंद; कालव्यांच्या दुरुस्तीसाठी गोवा-महाराष्ट्र सरकारचा निर्णय!

Tillari Dam | 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या काळात कालव्यांची दुरुस्ती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी
गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणातून गोव्याला होणारा पाणीपुरवठा महाराष्ट्रातील डाव्या व उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तीन महिने बंद राहणार आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत कालव्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामाला दोन्ही राज्यांची संमती असून, दुरुस्तीसाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा कार्यारंभ आदेश मार्चमध्ये काढण्यात आला आहे.

आंतरराज्य प्रकल्प असलेल्या तिळारी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची दुरावस्था झाली आहे. डाव्या कालव्याची लांबी १८.३८ किमी आहे. त्यातून बारदेश, पेडणे व डिचोली तालुक्यांतील गावांना पाणी पुरविले जाते. उजवा कालवा २४.६९ किमीचा आहे. यातून दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांतील गावांना पाणीपुरवठा होतो. या दोघांचा जोड कालवा ३.५३ किमी लांबीचा आहे.


काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने कालव्यांच्या दुरुस्तीसाठी २९५ कोटी रुपये दिले होते. एवढा निधी उपलब्ध होऊनही कालव्यांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे कालवे फुटून गोव्यातील पाणीपुरवठा अनेक दिवस बंद राहण्याचे प्रकार घडत होते. आता पुन्हा डाव्या व उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

गोवा आणि महाराष्ट्रातील मंत्री तसेच जलस्रोत खात्याच्या मंत्र्यांची संयुक्त संनियंत्रण बैठक झाली. गेल्या तीन वर्षांपासून कालव्यांच्या दुरुस्तीबाबत दोन्ही राज्यांमध्ये चर्चा व बैठका सुरू होत्या. अखेर या कामाला मूर्त रूप आले असून, १ ऑक्टोबरला कामाचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे.
या तीन महिन्यांच्या काळात दोन्ही कालवे बंद राहणार असल्याने सिंचनासाठी तिळारी कालव्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. याबाबत महाराष्ट्राच्या जलसिंचन खात्याने स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांना सूचना दिली आहे.

२५ वर्षे पुन्हा दुरुस्तीची गरज नाही

"येत्या २५ वर्षांत कालव्यांची पुन्हा दुरुस्ती करण्याची गरज पडणार नाही, इतके दर्जेदार काम केले जाणार आहे. दोन्ही राज्यांच्या संमतीने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या काळात कालव्यांद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे तिळारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले."

कालव्यांचे आयुष्यमान संपले

तिळारी धरणाचे पाणी गोव्यातील पेडणे, डिचोली तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पात येते. याशिवाय दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावे सिंचनासाठी या पाण्याचा वापर करतात. कालव्यांचे आयुष्यमान ३० ते ४० वर्षे असून ते संपले आहे. त्यामुळे कालवे वारंवार फुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर आता कालवा दुरुस्तीची मात्रा दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT