mahadayi river dispute dharwad meeting today
पणजी : पुढारी वृत्तसेवा
म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीच्या खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावावर, तसेच त्याचे गोव्यावर होणारे संभाव्य परिणाम यावर चर्चा करण्यासाठी शनिवार, दि. २४ व रविवार दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी धारवाड येथील सेवालय येथे दोन दिवसीय आंतरराज्यीय सल्लामसलत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीला कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील नदी खोऱ्यातील शेतकरी, शेतकरी नेते, सामाजिक संस्था, वकील आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी होऊन पाण्याची गरज, पर्यावरणविषयक चिंता आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावरील संभाव्य उपायांवर चर्चा करणार आहेत.
हुबळी-धारवाड, नरगुंड, नवलगुंड, रों आणि बदामी या मलप्रभा नदीच्या खोऱ्यातील भागांना अनेक दशकांपासून पाणीटंचाईसह विविध जल समस्यांचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिक आणि शेतकरी आपल्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडे वारंवार मागणी करत आहेत. मात्र, अध्याप या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. म्हादई नदीचे पाणी मलप्रभा खोऱ्यात वळवण्याचा प्रस्ताव हा वादाचा प्रमुख मुद्दा ठरला आहे.
गोव्यासाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या म्हादई नदीचे पाणी वळविल्यास नदीच्या पर्यावरणीय संतुलनावर, तसेच या नदीवर अवलंबून असलेल्या समुदायांच्या हितावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या विषयावर जवळपास तीन दशक चर्चा आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असूनही अध्याप तोडगा निघालेला नाही.
नजीकच्या काळातही प्रश्न सुटण्याची स्पष्ट चिन्हे दिसत नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील संबंधित घटकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या मागण्या, चिंता आणि आक्षेप यांवर खुलेपणाने व रचनात्मक चर्चा घडवून आणणे हा या बैठकीचा उद्देश आहे.
नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्सचे (एनपीएम) निर्मलगौडा यांनी सांगितले की, प्रभावित समुदाय आणि इतर संबंधित घटकांमध्ये विधायक संवाद घडवून आणण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. एनपीएम सोबत स्पार्क कर्नाटक, इको वॉच, सर्वोदय समाज, पीपल फर्स्ट फाउंडेशन, गांधी शांती प्रतिष्ठान आणि हुबळी-धारवाड सिटिझन्स एन्व्हायरन्मेंट कमिटी या संस्थांनी संयुक्तपणे या बैठकीचे आयोजन केले आहे.