Rice Farming 
गोवा

Rice Farming Goa | गोव्यातील भातशेतीवर 'गुंडी कीड'चा धोका! पिके वाचवण्यासाठी कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Rice Farming Goa | पीक फुलोऱ्याच्या प्रक्रियेत, दाणे भरण्याच्या स्थितीत नियमित देखरेखीचे कृषी विभागाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील शेतकऱ्यांना भातशेतीत 'गुंडी कीड'चा (राईस इअरहेड बग किंवा कण-पोकळ करणारी कीड असेही म्हणतात) प्रादुर्भावाकडे बारकाईने लक्ष देण्याचा कृषी खात्याकडून सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः पीक फुलोऱ्यावर असताना, तसेच दाणे दुधाळ अवस्थेत असताना आणि भरण्याच्या अवस्थेत असताना या कीडीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, कारण या काळात ती भाताच्या तयार होणाऱ्या दाण्यांचे मोठे नुकसान करू शकते.

'लेप्टोकोरिसा ॲक्युटा' असे शास्त्रीय नाव असलेली ही कीड रस शोषून घेणारी असून ती भाताच्या दाण्यांवर उपजीविका करते. या कीडीचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे. जर वेळेत प्रादुर्भाव लक्षात आला नाही, तर कापणीनंतरच नुकसान दिसून येते; तेव्हा अनेक दाणे रिकामे किंवा अपूर्ण भरलेले आढळतात, ज्याला स्थानिक भाषेत 'पोल' असे म्हटले जाते.
गोव्यात सुमारे २४,४४९ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. यात खरीप आणि रब्बी हंगामात सासष्टी तालुक्याचा वाटा सुमारे ७,२०० हेक्टर इतका आहे. या तालुक्यात सखल भागातील भातशेती आणि उंचावरील जमिनी अशा दोन्ही प्रकारची क्षेत्रे मोठ्या प्रमाणात आहेत.

मडगावचे विभागीय कृषी अधिकारी शरीफ फुर्तादो यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, पिकाच्या संवेदनशील अवस्थांमध्ये शेताची पाहणी वाढवावी आणि भाताच्या कणसांभोवती प्रौढ कीटक तसेच त्यांची पिल्ले आहेत का, हे तपासावे. त्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा त्वरित वापर करण्याऐवजी 'एकात्मिक कीड व्यवस्थापन' पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला.
शेतकऱ्यांना शेताचे बांध स्वच्छ ठेवण्याचा आणि तण व गवत यांचे व्यवस्थापन करण्याचाही सल्ला दिला, कारण या तणांमध्ये कीडीला आश्रय आणि अन्नाचे पर्यायी स्रोत मिळतात.

तसेच, कोळी, टिफन्या, भक्षक कीटक आणि मुंग्या यांसारख्या कीडीच्या नैसर्गिक शत्रूंचे जतन करावे, कारण ते कीडीची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, असे त्यांनी सांगितले.
प्रौढ 'गुंडी कीड' हा साधारण १५-२० मिमी लांबीचा, सोडपातळ आणि हिरवट-पिवळ्या ते तपकिरी-हिरव्या रंगाचा कीटक असतो. त्याला लांब पाय आणि स्पर्शिका असतात. त्रास दिल्यास किंवा चिरडल्यास त्यातून दुर्गंधी येते.

या कीडीची अंडी साधारणपणे भाताच्या पानांच्या मध्य-शिरेवर दोन ओळींत समूहाने घातली जातात. यांची पिल्ले निम्फ दिसायला प्रौढ कीटकांसारखी असतात; परंतु त्यांच्या पंखांचा पूर्ण विकास झालेला नसतो.
प्रादुर्भावाच्या लक्षणांमध्ये भाताच्या तुसावर तपकिरी किंवा विरंगुळा झालेले चट्टे दिसणे, अन्न शोषण्यासाठी केलेल्या छिद्रांभोवती काले किंवा तपकिरी ठिपके पडणे आणि दाणे आकसणे किंवा भरगच्च न भरता ते अपूर्ण किंवा खडूंसारखे पांढऱ्या रंगाचे राहणे यांचा समावेश होतो.


उपाययोजनांची शिफारस:

कृषी विभागाने एकात्मिक कीड व्यवस्थापन उपाययोजनांची शिफारस केली आहे. यात नियमित निरीक्षण, शेत आणि बांधांचे योग्य व्यवस्थापन, मर्यादित क्षेत्रातील प्रादुर्भावावर यांत्रिक नियंत्रण आणि उपयुक्त कीटकांचे जतन यांचा समावेश आहे. तसेच, शेतकरी शिफारस केलेल्या पद्धतीनुसार कडुनिंबावर आधारित जैविक कीटकनाशके आणि इतर मान्यताप्राप्त जैविक निविष्ठांचा वापर करण्याचा विचार करू शकतात.

कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन:

कीटकांची संख्या तपासून आणि योग्य तांत्रिक मार्गदर्शन घेऊनच रासायनिक उपाययोजना कराव्यात, फुर्तादो यांनी यावर भर दिला की, कीडीची लवकर ओळख पटणे अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण एकदा का पीक कापणीच्या टप्प्यावर आले की, दाण्यांचे झालेले नुकसान भरून काढता येत नाही. ज्या शेतकऱ्यांना 'गुंडी' कीटकांचा प्रादुर्भाव असामान्य पातळीवर दिसून येईल, त्यांनी मार्गदर्शनासाठी जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असा सल्ला कृषी खात्याकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT